चिपळूण : भारतीय इतिहासातील एक अजेय योद्धा, दूरदृष्टी असलेलं नेतृत्व, कुशल प्रशासक आणि मराठा साम्राज्याचे प्रतीक म्हणून अजरामर असलेले बाजीराव पेशवे यांचा संपूर्ण जीवनपटच संघर्षान भरलेला आहे. सांघिक कार्यालय मुंबई संस्थेने बाजीराव’ हे नाटक सादर करून प्रेक्षकांसमोर बाजीराव पेशवेंचा संपूर्ण जीवनपट खूप सुंदरपणे उलघडला. बाजीराव पेशवेंच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग अतिशय विचारपूर्वक मांडले आहेत. ते मांडताना अभिनय, संवाद, देहबोली, प्रकाशयोजना आणि संगीत यामुळे अनेक प्रसंग वास्तववादी वाटतात. या नाटकाने रसिकांची मने जिंकली. महानिर्मिती नाट्य स्पर्धेत शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात बाजीराव नाटक सादर झाले. एक ऐतिहासिक नाट्य कलाकृती रसिकांना पहावयास मिळाली. या बाजीरावाचा जीवन प्रवास मांडण्याचा प्रयत्न लेखक समीर म्हस्के यांनी सुंदररित्या केला होता. बऱ्याचदा बाजीराव पेशवेंवर बोलताना त्यांच्या पराक्रमावर बोलण्यापेक्षा बाजीराव-मस्तानी या विषयावर बोलले जाते.
पण बाजीरावांची छत्रपती शाहू महाराजांनी अवघ्या विसाव्या वर्षी पेशवे (प्रधानमंत्री) म्हणून नियुक्ती केली. अल्पवय असूनही बाजीरावांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्तेने, धाडसाने व लष्करी कौशल्याने मराठा साम्राज्याला अभूतपूर्व उंचीवर नेले. आयुष्यात एकही युद्ध न हरलेले सेनापती म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी मुघल सत्तेला जोरदार आव्हान देत अखंड हिंदुस्थानात मराठ्यांचा प्रभाव वाढवला. वैयक्तिक आयुष्यात त्यांचे मस्तानीशी असलेले नाते ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विशेष चर्चेत राहिले आहे.
प्रस्थापित व्यवस्थेला झुगारून बाजीराव सोबत लग्न करणे ही मस्तानीकरिता मोठी लढाई होती. ऐन युद्धात मानसिक आधार देत सर्वांना सांभाळून घेणारी मस्तानी दुर्दैवाने रूप आणि सौंदर्य यात अडकवली गेली. बाजीरावांच्या मनामध्ये पत्नी काशीबाई आणि मस्तानी यांच्यामध्ये कधी अंतर नव्हते. त्यांचे विचार आधुनिक होते आणि ते आपल्या विचारांवर ठाम होते. अशा या शूरवीर सेनापतीचं नाटकामध्ये माध्यमातून चित्रण करणं हे तसं खूप आव्हानात्मक काम. मात्र सांघिक कार्यालय मुंबई यांनी ‘बाजीराव’ हे नाटक सादर करून प्रेक्षकांसमोर बाजीराव पेशवेंचा संपूर्ण जीवनपट खूप सुंदरपणे उलघडला. बाजीराव पेशवेंच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग अतिशय विचारपूर्वक मांडले आहेत. बाजीराव या पात्राची वैयक्तिक नात्यामुळे सामाजिक आयुष्यात होणारी घुसमट अभिनय आणि सादरीकरणाच्या जोरावर उत्तमपणे दाखवली आहे. बाजीराव पेशव्यांचं आयुष्य फक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आलेल्या मस्तानीशी जोडण्यापेक्षा त्यांच्या नात्यातली सत्यता दाखवण्याचा संपूर्ण नाटकात प्रयत्न जाणवतो. बाजीराव नाटक पाहताना रसिकांना इतिहास काळात गेल्याचा आणि ती क्षणचित्रे डोळ्यासमोर उभी राहिल्याचा मनोमनी भास झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:31 PM 24/Jan/2026














