गुहागरमध्ये फिरत्या मोबाइल लोकअदालतीतून १४ प्रकरणे निकाली

रत्नागिरी : गुहागर तालुका विधी सेवा समितीतर्फे आयोजित फिरत्या मोबाइल लोकअदालतीतून एकूण १४ प्रकरणे यशस्वीरीत्या निकाली काढण्यात आली.

या व्हॅनचे उद्घाटन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा गुहागर दिवाणी न्यायाधीश पी. व्ही.

कपाडिया यांच्या हस्ते सर्व वकील, पक्षकार आणि न्यायालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर ही लोकअदालत व्हॅन पाटपन्हाळे येथील लोकअदालतीच्या ठिकाणी रवाना करण्यात आली.

लोकअदालतीत गुहागर दिवाणी न्यायालयातील प्रलंबित सहा प्रकरणे तसेच आठ प्रीलिटिगेशन प्रकरणे अशी एकूण १४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या सर्व प्रकरणांतून २७ हजार ४७७ रुपयांची तडजोड साध्य झाली.

या लोकअदालतीसाठी पॅनल प्रमुख म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश डी. एस. जामखेडकर यांनी काम पाहिले. पॅनल विधीज्ञ म्हणून अ‍ॅड. सुशील अवेरे यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे महिलांच्या कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियमांतर्गत दाखल असलेल्या एका प्रकरणात पती-पत्नीमधील कौटुंबिक वादात सलोखा निर्माण होऊन दोघांनी नव्याने संसाराला सुरुवात केल्याने लोकअदालतीच्या माध्यमातून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले. पुढील काळातही असा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:33 24-01-2026