रत्नागिरी : गोळप परिसरात भात कापणीला वेग

पावस : ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच सायंकाळच्या वेळी सतत पडणाऱ्या पावसामुळे भात कापणीची कामे खोळंबली होती. परंतु, गेले दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तालुक्यातील गोळप परिसरात भात कापणी व झोडणीच्या कामाला वेग आला आहे. परिसरात ६० टक्के भात कापणीची कामे पूर्ण झाली आहेत.

यंदाच्या पावसाने दमदार सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. त्यामुळे यावर्षी भात पेरणी व भात लागवड वेळेमध्ये पूर्णत्वास गेली होती. हळवी बियाणे लवकर झाली. मात्र, ऑक्टोबर महिन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे कापणीची कामे खोळंबली होती. आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कापणीच्या कामांनी वेग घेतला आहे. कुटुंबातील सर्वच सदस्य शेतीच्या कामात व्यस्त झाली आहेत.

सकाळी भात कापल्यानंतर तातडीने भात झोडणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत उर्वरित भात कापणी पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 29/Oct/2024