खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत पीफास या अत्यंत घातक ‘फॉरेव्हर केमिकल्स’च्या निर्मितीबाबत करण्यात आलेल्या गंभीर आरोपांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकरणात स्थानिक नागरिकांच्या आरोग्य व जीवनाच्या अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आयोगाने नोंदवला असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाला दोन आठवड्यांच्या आत Action Taken Report सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
इटलीतील मिटेनी या संस्थेचा पीफास रसायननिर्मिती प्लांट पर्यावरणीय प्रदक्षण व पाणी विषबाधा प्रकरणामुळे तेथे वादग्रस्त ठरला होता. त्याच प्लांटमधील उपकरणे महाराष्ट्रातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत स्थलांतरित करून पुन्हा वापरात आणल्याचे गंभीर आरोप या तक्रारीत करण्यात आले आहेत. या आरोपांमुळे संपूर्ण राज्यात तसेच देशपातळीवर तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
मूळच्या मुर्डी (ता. खेड) येथील व सध्या पुणे येथे कार्यरत असलेल्या उच्चपदस्थ कॉर्पोरेट अधिकारी मुक्ता भातखंडे जोशी यांनी १२ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवर १६ जानेवारी २०२६ रोजी सुनावणी घेत आयोगाचे सदस्य प्रियंक कानुंगो यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मानवाधिकार संरक्षण अधिनियम, १९९३ च्या कलम १२ अंतर्गत प्रकरणाची दखल घेतली.
तक्रारीत पीफास रसायने मानवी आरोग्यास अत्यंत घातक असून कर्करोग, हार्मोनल बिघाड, प्रजननक्षमतेवर परिणाम तसेच दीर्घकालीन आजारांचा धोका वाढवतात, असे नमूद करण्यात आले आहे. डोंबिवली व तळोजा येथील रासायनिक औद्योगिक पट्ट्यांतील पूर्वीच्या पर्यावरणीय दुर्लक्षाची उदाहरणे देत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
या प्रकरणाबाबत यापूर्वी MPCB तसेच स्थानिक पोलिसांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे स्वतंत्र तज्ज्ञांमार्फत चौकशी, कडक पर्यावरणीय देखरेख आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.
आयोगाने संबंधित प्राधिकरणांना स्पष्ट केले आहे की अहवाल HRCNet पोर्टलद्वारेच सादर करावा लागेल, ई-मेलद्वारे पाठवलेले अहवाल ग्राह्य धरले जाणार नाहीत. येत्या अहवालानंतर या प्रकरणात पुढील कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात असून, पर्यावरणवादी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक या निर्णयाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 26/Jan/2026














