“हा सन्मान आधी मिळायला हवा होता…”; धर्मेंद्र यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर होताच हेमा मालिनींनी व्यक्त केली खंत

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने २०२६ सालच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये बॉलिवूडचे दिवंगत दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार जाहीर झाला.

या घोषणेनंतर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून, त्या भावुक झाल्या आहेत. काय म्हणाल्या हेमा मालिनी?

हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया चर्चेत

हेमा मालिनी यांनी X वर धर्मेंद्र यांचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “मला खूप अभिमान वाटतोय की सरकारने चित्रपटसृष्टीतील धरमजींचे मोठे योगदान ओळखून त्यांना प्रतिष्ठित ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. मी सरकारची अत्यंत आभारी आहे.”

याशिवाय हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना हेमा मालिनी यांनी आपल्या मनातील खंतही व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “हा सन्मान त्यांना खूप आधीच मिळायला हवा होता. या पुरस्कारावर खरा हक्क त्यांचा होता. पण आज त्यांना मिळालेला हा पुरस्कार आमच्यासाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी सन्मानाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.” हेमा मालिनी पुढे म्हणाल्या की, ”धर्मेंद्र यांनी केवळ एक अभिनेता म्हणूनच नाही, तर एक माणूस म्हणूनही नेहमीच इतरांना मदत केली आहे, जे विलक्षण होते.”

धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले होते. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त केली जात होती. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ‘शोले’, ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’, ‘चुपके चुपके’ यांसारख्या अनेक अजरामर चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.

धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर होताच चाहत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. अनेकांनी “खऱ्या हिरोला अखेर योग्य सन्मान मिळाला” अशा भावना व्यक्त केल्या आहेत. धर्मेंद्र यांच्यासोबतच यावर्षी चित्रपटसृष्टीतील इतर दिग्गजांनाही पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत, ज्यात ममूटी (पद्मभूषण), अलका याज्ञिक (पद्मभूषण) आणि आर. माधवन (पद्मश्री) यांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 26-01-2026