Dapoli: मांदिवलीतील बॉक्साईट वाहतुकीवर मानवाधिकार आयोगाची चौकशी अर्धवट; ग्रामस्थ संतप्त

दापोली – दापोली तालुक्यातील मांदिवली गावात उर्दू शाळेजवळून सुरू असलेल्या बॉक्साईट वाहतुकीमुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्य व शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याच्या तक्रारींची थेट दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेली समिती शुक्रवारी मांदिवली येथे स्थळ पाहणीसाठी दाखल झाली होती; मात्र चौकशीदरम्यान निर्माण झालेल्या गोंधळामुळे कोणताही निष्कर्ष नोंदविण्यापूर्वीच समिती माघारी परतली. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मांदिवली गावात सुरू असलेल्या बेसुमार बॉक्साईट उत्खनन व वाहतुकीमुळे रस्त्यालगत असलेल्या उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने करण्यात येत होत्या. धुळीचे प्रदूषण, अवजड वाहनांची वर्दळ, अपघाताचा धोका आणि सततचा आवाज यामुळे शाळेचे शैक्षणिक वातावरण पूर्णतः बिघडल्याचा आरोप पालक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाकडून दखल न घेतल्याने ग्रामस्थ भावेश कारेकर यांनी थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीची दखल घेत आयोगाने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात आली होती. समितीत जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, दापोली तालुका आरोग्य अधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चिपळूण उपप्रादेशिक अधिकारी सदस्य सचिव म्हणून सहभागी होते.

समिती शुक्रवारी सकाळी ११ वाजता मांदिवली येथे येणार होती; मात्र ती सुमारे पावणे दोन तास उशिरा, दुपारी १ वाजता घटनास्थळी पोहोचली. याच वेळेत शुक्रवारचा नमाज असल्याने अनेक मुस्लिम ग्रामस्थ मशिदीत गेले होते. ग्रामस्थ उपस्थित होत असतानाच संबंधित आशापुरा मायनिंग कंपनीचे अधिकारी व काही ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले.

चौकशीदरम्यान समितीकडून तक्रारदार व ग्रामस्थांना उलटसुलट प्रश्न विचारण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. कंपनीच्या प्रतिनिधींनी आपली बाजू मांडल्यानंतर ग्रामस्थांनी कंपनीकडून सुरू असलेल्या दादागिरीबाबत आणि विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबाबत संताप व्यक्त केला. यावेळी दोन गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या गोंधळाचे कारण देत समितीने ग्रामस्थांच्या लेखी तक्रारी न स्वीकारताच घटनास्थळावरून माघार घेतली.

समिती कोणताही निर्णय न देता निघून गेल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. समिती सदस्य वाहनात बसल्यानंतर ग्रामस्थांनी वाहनाला घेराव घालून ‘आमचा प्रश्न सोडवा आणि मगच जा’ अशी मागणी केली. ग्रामस्थांकडून लेखी तक्रारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्या स्वीकारल्या गेल्या नाहीत, असा आरोप आहे. यावेळी ‘मायनिंग बंद करा, नाहीतर शाळेला दुसरी जागा द्या’ आणि ‘मायनिंग हटाओ, हमारे बच्चे बचाओ’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दापोलीचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी लेखी तक्रार दिल्यास त्याची दखल घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, २०२३ पासून या बॉक्साईट उत्खनन व वाहतुकीविरोधात तक्रारी होत असतानाही शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. धुळीमुळे विद्यार्थ्यांना श्वसनविकार होत असून, काही घरांना तडे गेल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावात आरोग्यसेवेची कोणतीही सुविधा नसताना शाळेपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर उत्खनन सुरू होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. गंभीर विषयावर चौकशीस आलेली समिती कोणताही निष्कर्ष नोंदवता माघारी गेल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

“आमची मुले शाळेत शिकायला जातात की आजारी पडायला, हेच कळेनासे झाले आहे. दिवसभर धुळीचे लोट, प्रचंड आवाज आणि ट्रकांची वर्दळ असते. प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी,” अशी संतप्त प्रतिक्रिया महिला पालक नजराना असलम मुकादम यांनी व्यक्त केली.

“शाळकरी मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असताना चौकशी अर्धवट सोडून जाणे दुर्दैवी आहे. आमची मागणी स्पष्ट आहे. शाळेजवळील बॉक्साईट वाहतूक व उत्खनन तात्काळ थांबवावे; अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल,” अशी भूमिका तक्रारदार भावेश कारेकर यांनी मांडली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 26-01-2026