Ratnagiri : चांदण्यासह वाऱ्यामुळे मच्छीमार अडचणीत

रत्नागिरी : निसर्गाच्या कोपामुळे गेले महिनाभर जिल्ह्यातील मच्छीमारांना मासळीच मिळेनाशी झाली आहे. प्रथम पौर्णिमेच्या चांदण्यामुळे मासळी स्थलांतरित झाल्याने ती मिळत नव्हती. आता समुद्रात वारा असल्याने मच्छीमार नौका समुद्रात जाण्यासही धजावत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमार आर्थिक अडचणीमुळे मेटाकुटीला आला आहे. याचा परिणाम म्हणून रविवारी मासळीचे दर चढे असल्याने मच्छीमार्केटमध्ये खवय्यांची वानवा होती.

जानेवारीच्या ३ तारखेला पौर्णिमा होती. पौर्णिमेच्या अगोदरचे आणि नंतरचे काही दिवस मासळी स्थलांतरीत होते. दरवर्षीचा हा अनुभव आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाथ मच्छीमार नौकांना मासळी खर्चाइतकीही मिळत नव्हती. पौर्णिमचा मासे न मिळण्याचा परिणाम ओसरत असतानाच समुद्रात जोरदार वारे सुरु झाले. समुद्रात नौकांची मासे पकडण्याची जाळी वाऱ्यांमुळे गुरफटून तुटू लागली. आधीच मासे कमी प्रमाणात मिळत असताना नादुरुस्त होणाऱ्या जाळ्यांचा खर्च अंगावर पडू लागला. त्यामुळे अर्ध्यावर मासेमारी सोडून नौका पुन्हा बंदरात परतण्याचे प्रमाण वाढले.

नौकांचे इंधन, नौकेवरील खलाशी व इतर कामागारांचे रेशन, बर्फ असा विविध खर्च करूनही तो वसूल होण्याइतकीही मासळी मिळत नाही, अशी अवस्था आहे. जी काही मासळी मिळत आहे ती महाग दराने विकावी लागत आहे. हे दर परवडत नसल्याने प्रमुख मच्छीमार्केटमध्ये ग्राहकांचा शुकशुकाट होता. पापलेटचे दर्शन तर दुर्लभच होते. मोठा सरंगा ६५० ते ७०० रु. किलो दराने बंदरावरून खरेदी करावी लागल्याचे मच्छीमार महिला भाटकर यांनी सांगितले. सुरमईचा दर ८०० ते ९०० रुपये, सौंदाळे ३०० ते ३५० दराने मिळत होते. बांगड्याचा किलोचा दर २०० रु. किलो होता. व्हाईट कोळंबी ५०० ते ६०० रु. किलो दराने विकली जात होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:24 PM 26/Jan/2026