Ratnagiri : प्रगतशील शेतकऱ्याचा उन्हाळी भातशेतीचा प्रयोग ठरतोय यशस्वी

पावस : एकत्र कुटुंब पद्धती संपुष्टात येत चालल्याने शेतीपासून दूर जाण्याचा कल वाढत असताना, बदलते हवामान, मजुरीचा वाढता खर्च आणि अनिश्चित उत्पन्नामुळे भातशेती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, अशी सर्वसाधारण भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र अशा परिस्थितीतही पारंपरिक भातशेतीला आधुनिक प्रयोगांची जोड देत रत्नागिरी तालुक्यातील गावडे-आंबेरे विरजेवाडी येथील प्रगतशील शेतकरी रवींद्र मारुती बिर्जे यांनी उन्हाळी भातशेतीचा यशस्वी प्रयोग करून शेतीही हमखास उत्पन्नाचे साधन ठरू शकते, हे दाखवून दिले आहे.

बिर्जे यांचा भातशेतीचा वारसा पिढ्यान पिढ्या चालत आलेला आहे. वडिलांनी वडिलोपार्जित जमिनीत हापूस आंबा व नारळाची लागवड करून टप्प्याटप्प्याने उत्पन्नाचे स्रोत निर्माण केले. मात्र, भातशेतीकडे दुर्लक्ष न करता पावसाळी भातशेती सातत्याने सुरू ठेवत कुटुंबाच्या उपजीविकेचा कणा मजबूत केला. याच भूमिकेतून पावसाळ्यानंतर मोकळ्या होणाऱ्या जमिनीत उन्हाळी भातशेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यावर्षी २५ गुंठे क्षेत्रात ‘इंद्रायणी’ या १३५ दिवसांच्या भात वाणाची लागवड प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली आहे. १ डिसेंबर रोजी पेरणी व त्यानंतर लावणी करण्यात आली. सध्या पीक उत्तम स्थितीत असून अपेक्षेपेक्षा चांगले उत्पादन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरवर्षी सुमारे एक एकर क्षेत्रात पावसाळी भातशेती केली जाते. मात्र अतिवृष्टी, हवामानातील बदल, किड व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे भातशेतीच्या या उत्पादनावर परिणाम होतो. तरीही योग्य मेहनत व व्यवस्थापनामुळे घरगुती वापरासाठी पुरेसा भात उत्पादित होतो, त्यामुळे बाजारातून तांदूळ खरेदी करण्याची गरज भासत नाही, असे बिर्जे यांनी बोलताना सांगितले.

उन्हाळी भातशेतीसाठी पंपाच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जातो. घरच्या गायी-म्हशींचे शेण वापरून पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती केली जात असल्याने किड व रोगांचा प्रादुर्भाव अत्यल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात पाणी बचतीसाठी स्प्रिंकलर प्रणाली कृषी विभागाच्या माध्यमातून बसवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. बदलत्या हवामानामुळे पावसाळी भातशेतीत तोटा संभवतो; मात्र उन्हाळी भातशेतीत २५ गुंठ्यांत सुमारे १००० किलो तांदळाचे उत्पादन अपेक्षित असून ही शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असल्याचे बिर्जे यांनी सांगितले.

उन्हाळी भात लागवड ते काढणीपर्यंत हा प्लॉट कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली व निरीक्षणाखाली राहणार आहे. उन्हाळी भातशेतीत किड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी उन्हाळी भात लागवड करावी- ज्ञानेश्वर राऊत, सहायक कृषी अधिकारी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 26/Jan/2026