रत्नागिरीच्या सागरी सीमांवर तिरंगा डौलानं लहरला! प्रजासत्ताक दिनी ६ निर्जन बेटांवर पोलिसांची ‘वॉरशिप’; एसपींनी फडकवला सुवर्णदुर्गात ध्वज

रत्नागिरी : सागरी सुरक्षेला अभेद्य करण्यासाठी आणि देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाने (Ratnagiri Police) प्रजासत्ताक दिनी एक ऐतिहासिक कामगिरी पार पाडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिलेल्या निर्देशानुसार, रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीतील ६ निर्जन बेटांवर (Uninhabited Islands) जाऊन पोलिसांनी प्रजासत्ताक दिनी भारताचा तिरंगा फडकवला.

नेमका उपक्रम काय?

२०२४ च्या DGP-IGP परिषदेत पंतप्रधानांनी सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी, राज्यातील निर्जन बेटांवर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला ध्वजारोहण करण्याचे आणि तिथे पोलिसांचे वास्तव्य वाढवण्याचे निर्देश दिले होते. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दलाने हा धाडसी उपक्रम राबविला.

सुवर्णदुर्गात एसपींनी फडकवला ध्वज

दापोलीच्या समुद्रात असलेल्या ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्यावर (Suvarnadurg Fort) खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे (SP Nitin Bagate) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, दापोलीचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर, अश्वनाथ खेडकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

या ६ बेटांवर फडकला तिरंगा: रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १५ बेटे असून त्यापैकी १३ निर्मनुष्य आहेत. यातील खालील ६ बेटांवर पोलिसांनी यशस्वीरित्या पोहोचून ध्वजारोहण केले: १. सुवर्णदुर्ग किल्ला (बेट), हर्णे (दापोली) २. बाबा मलंग दर्गा (खेड) ३. जुवाड पेठ बेट, गोवळकोट (चिपळूण) ४. जुव्याचे पेंद, कुरधुंडा (संगमेश्वर) ५. जुवे बेट, बुरंबेवाड (नाटे) ६. वाकडवन, कोंडसर (नाटे)

या मोहिमेत पोलीस पाटील, माजी सैनिक, एनसीसीचे विद्यार्थी तसेच मत्स्य व बंदर विभागाचे कर्मचारीही सहभागी झाले होते. या उपक्रमातून रत्नागिरी पोलिसांनी सागरी सीमांच्या सुरक्षेबाबत आणि राष्ट्रीय एकात्मतेबाबत एक जबरदस्त संदेश दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 27/Jan/2026