रत्नागिरी : कौशल्य विकासासाठी बारटक्के इन्स्टिट्यूटचा सामंजस्य करार

रत्नागिरी : विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण मिळावे आणि त्यांच्यातील तांत्रिक कौशल्ये विकसित व्हावीत, या उद्देशाने रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची बारटक्के इन्स्टिट्यूट आणि एसएसके इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड या इन्फोटेक कंपनीमध्ये एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. ही कंपनी रत्नागिरी तसेच पुणे येथून विविध कंपन्यांसाठी काम करत आहे.

या करारामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि उद्योगांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहे. या भागीदारीमुळे शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील अंतर कमी करण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कालावधीत एसएसके इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. उद्योगांमध्ये सध्या सुरू असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून अभ्यासक्रमात बदल केले जातील, जेणेकरून विद्यार्थी नोकरीसाठी सज्ज होतील. त्याचप्रमाणे एसएसके इनोव्हेशन्समधील अनुभवी अभियंते आणि तज्ज्ञ वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. या प्रशिक्षणातून तयार झालेल्या कुशल विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतील.

यावेळी बारटक्के इन्स्टिट्यूटच्या समन्वयक सौ. घारपुरे म्हणाल्या की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. उद्योगांना नेमके काय हवे आहे, हे ओळखून आम्ही विद्यार्थ्यांना घडवत आहोत. एसएसके इनोव्हेशन्ससोबतच्या या करारामुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा मिळेल.

एसएसके इनोव्हेशन्सचे देव मळेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणारी पिढी तयार करणे ही काळाची गरज आहे. या उपक्रमातून आम्ही विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण विचार करण्यास प्रवृत्त करू. रत्नागिरी शहरातील विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी प्राधान्य दिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 27-01-2026