खेड : तालुक्यातील खाडीपट्टा विभागात ‘महावितरण’च्या भोंगळ कारभाराचा फटका ४० गावांतील ग्रामस्थांना बसला. खाडीपट्ट्यातील ४० गाव सलग पाच दिवस अंधारात होती. वीजपुरवठा सुरू करण्याबाबत सातत्याने तक्रारी करूनही ‘महावितरण’चे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे ‘महावितरण’च्या खाडीपट्ट्यातील शाखा अभियंत्याच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणीही होत आहे.
तालुक्यातील विभागातील मूळगाव ‘महावितरण’चे उपकेंद्र आहे. लोटे येथून आयनीमार्गे व आमशेत येथून मूळगाव उपकेंद्राला वीजपुरवठा केला जातो; मात्र कोणतेही कारण नसताना खाडीपट्टयाला होणारा वीजपुरवठा लोटे औद्योगिक वसाहतीला देण्याचे काम शाखा अभियंता बडगुजर यांनी केल्याचा आरोप माजी सरपंच संजय गोळटकर यांनी केला आहे. त्यामुळे ४० गावांतील ग्रामस्थांना सलग पाच दिवस अंधारात राहावे लागले. वीज नसल्याने त्याचा परिणाम नळपाणी योजनाही बंद होत्या. ‘महावितरण’च्या भोंगळ कारभाराचा खाडीपट्ट्यातील दुकान व्यावसायिकांनाही आर्थिक फटका बसला आहे.
मोर्चा काढण्याचा इशारा
खाडीपट्ट्यात ‘महावितरण’च्या कारभाराचे पुरते धिंडवडे निघत असतानादेखील ठोस उपाययोजनांचा अवलंब केला जात नसल्याने ग्राहकही मेटाकुटीस आले आहेत. दीपावलीत ‘महावितरण’कडून वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास मूळगाव येथील उपकेंद्रावर ग्रामस्थांसमवेत मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 29/Oct/2024














