दापोलीत पर्यटकांच्या गाड्यांचा थरार! असूदमध्ये ब्रेझा आणि ट्रॅव्हलरची समोरासमोर जोरदार धडक; पुण्याच्या चालकावर गुन्हा दाखल

दापोली : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) सुट्ट्यांच्या कालावधीत कोकणात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाड्यांचा दापोलीत भीषण अपघात झाला आहे. दापोली तालुक्यातील मौजे असूद (Asud) येथे ब्रेझा कार आणि टॅम्पो ट्रॅव्हलर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्या ट्रॅव्हलर चालकाविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका अपघात कसा झाला? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी मंगेश सुरेश दाते (वय ३५, रा. शिंदे वस्ती, रावेत, पिंपरी-चिंचवड, पुणे) हे आपल्या ताब्यातील ब्रेझा कार (MH-14/MQ-7233) घेऊन मुरुड कडून दापोलीच्या दिशेने येत होते.

त्याच वेळी समोरून म्हणजे दापोलीकडून मुरुड बीचकडे (Murud Beach) जाणारा टॅम्पो ट्रॅव्हलर (MH-12/VF-9330) भरधाव वेगात आला. ट्रॅव्हलरचा चालक यशपालसिंग सुनील चव्हाण (वय २९, रा. वारजे माळवाडी, पुणे; मूळ रा. करमाळा, सोलापूर) याने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करत, आपली गाडी अतिशय वेगाने आणि धोकादायक रित्या चालवली. आसद येथील ‘न्यू वेलकम रेसिडेन्सी हॉटेल’ समोर त्याने फिर्यादी मंगेश दाते यांच्या ब्रेझा गाडीला उजव्या बाजूने जोराची धडक दिली.

पुण्याच्या चालकावर गुन्हा दाखल या अपघातात ब्रेझा कार आणि टॅम्पो ट्रॅव्हलरचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. याप्रकरणी फिर्यादी मंगेश दाते यांनी दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी ट्रॅव्हलर चालक यशपालसिंग चव्हाण याच्यावर भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१ (निष्काळजीपणे वाहन चालवणे) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा (क्रमांक ११/२०२६) दाखल केला आहे. दापोली पोलीस (Dapoli Police) अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 27-01-2026