खेड (प्रतिनिधी): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणदेवी येथे एका भरधाव स्पोर्ट्स बाईकने कारला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. हॉटेल ओमेगा इनच्या पार्किंग परिसरात घडलेल्या या अपघातानंतर, दुचाकीस्वाराने कार चालकाला मारहाण केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात पनवेल येथील दुचाकीस्वाराविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामानिमित्त पुण्यातून लोटे येथे आगमन
पुणे येथील रहिवासी महादेव अनंतराव टिंगरे हे लोटे एम.आय.डी.सी. मधील एका कंपनीत इलेक्ट्रिकल कामासाठी आपल्या होंडा सिटी कारने आले होते. २६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १:५९ च्या सुमारास आपले काम संपवून ते जेवणासाठी खेडकडून चिपळूणच्या दिशेने प्रवास करत होते. धामणदेवी येथील हॉटेल ओमेगा इनमध्ये प्रवेश करून ते आपली कार पार्किंगमध्ये उभी करत असताना हा अपघात घडला.
भरधाव स्पोर्ट्स बाईकची जोरदार धडक
फिर्यादी आपली कार लावत असताना पाठीमागून येणाऱ्या कावासाकी वर्सेस १००० या स्पोर्ट्स बाईकने त्यांच्या कारला चालक बाजूने जोराची धडक दिली. दुचाकीस्वार अजय प्रदीपकुमार शर्मा (रा. कामोठे, पनवेल) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णतः दुर्लक्ष करून, हयगयीने आणि मानवी जीविताला धोका निर्माण होईल अशा वेगाने वाहन चालवून ही धडक दिली. या धडकेमुळे कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
धडकेनंतर कार चालकाला मारहाण
अपघातानंतर महादेव टिंगरे हे गाडीतून खाली उतरत असताना आरोपी अजय शर्मा याने त्यांना शिवीगाळ करत वाद घातला. झालेल्या अपघाताबाबत जाब विचारला असता, वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी आरोपीने टिंगरे यांच्या कानाखाली मारून त्यांना शारीरिक इजा पोहचवली. भरदिवसा हॉटेलच्या पार्किंगमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित नागरिकही अवाक झाले.
खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या धक्कादायक प्रकारानंतर महादेव टिंगरे यांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपी अजय शर्मा याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, ११५ (२) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १४/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 27-01-2026














