चिपळूण (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील पोफळी येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीने वैयक्तिक तणावातून विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे.
वैयक्तिक तणावातून टोकाचे पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गणपत घाडगे (वय ५४ वर्ष, रा. पोफळी रूम नं. ६४/१, ता. चिपळूण) यांनी २३ जानेवारी २०२६ रोजी रात्री जेवण केल्यानंतर, त्यांच्या वैयक्तिक तणावातून घरात असलेले फवारणीचे कीटकनाशक/बुरशीनाशक औषध प्राशन केले. औषध प्यायल्यानंतर त्यांना उलट्या होऊ लागल्याने ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आली.
उपचारासाठी रुग्णालयांची धावपळ
संतोष घाडगे यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच, त्यांचे पुत्र निकिल संतोष घाडगे व नातेवाईकांनी त्यांना तातडीने खाजगी वाहनाने औषधोपचारासाठी परशुराम हॉस्पिटल घाणेखुंट येथे २४ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने सायंकाळी ५:०० वाजता त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये नेण्याचे ठरविण्यात आले.
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू
मुंबईला घेऊन जात असताना संतोष घाडगे यांची कोणतीही हालचाल होत नसल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या उपजिल्हा रुग्णालय कळंबणी (ता. खेड) येथे नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासले असता, रात्री २२:१५ वाजता मृत घोषित केले.
अलोरे शिरगाव पोलिसांत नोंद
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कार्यवाही सुरू केली आहे. खेड पोलीस ठाण्यातून प्राप्त माहितीनुसार, अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (आमृ) क्रमांक ०५/२०२६ नुसार बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये २६ जानेवारी रोजी दुपारी १४:३५ वाजता नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोफळी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 27-01-2026














