चिपळूण : येथील आंतर विद्युत केंद्र नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या ‘बदाम सात’ नाटकातून नातेसंबंधांमधील विविध पैलू उलगडण्यात आले. नात्यातील वेगळा दृष्टिकोन या नाटकातून कलाकारांनी प्रेक्षकांसमोर लिलया मांडला. नाशिक औष्णिक विद्युत केंद्राने हे नाटक सादर केले.
नाटकाचं कथानक ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या एका ‘सागर-प्राजक्ता’ या जोडप्याच्या नातेसंबंधांभोवती फिरते. साधारण ८-९ महिने ‘लिव्ह इन रिलेशनशिप ‘मध्ये राहिल्यानंतर नात्यातील नावीन्य कमी होऊन जेव्हा एकमेकांना गृहीत धरण्याचे व केवळ चुका दाखवण्याचे प्रकार वारंवार घडतात, तेव्हा या जोडप्यापैकी ‘सागर’ या पात्राला ‘लिव्ह इन’पेक्षा पूर्वीचं ‘इन लव्ह रिलेशनशिप’ पुन्हा जगता यावं, असं वाटायला लागतं. यासाठी ‘सागर’ जवळचे मित्र ‘अनिकेत’ आणि ‘राहुल’ यांची मदत घ्यायचा प्रयत्न करतो.
कथानक पुढे गेल्यानंतर एका टप्प्यावर त्या जोडप्यापैकी ‘प्राजक्ता’ या पात्राला ‘सागर’ करत असलेला प्रयत्न जेव्हा समजतो, त्यानंतर ती सागरच्या दोन्ही मित्रांना घरी बोलवते आणि सागरच्या सर्व शंका-कुशंकांची उत्तरे देते. तसेच नातेसंबंधांमधील तणाव कमी करण्यासाठी समोरच्याकडून बदलण्याची अपेक्षा करताना स्वतःमधील बदलाची गरज पटवून देते आणि नाटकाचा शेवट होतो.
या नाटकाचे लेखन हेमंत बेळे, दिग्दर्शन शैलेंद्र पाटील, नेपथ्य विजय साळवे, प्रभाकर रेवगडे, प्रकाश योजना महेश तुपे, विशाल जाधव, सहाय्य गौरव पुणेकर, रूपाली सकपाळ, रंगमंच व्यवस्था प्रवीण काळोखे, संगीत शुभांगी बोरकर, प्रियांका धंदर, रंगभूषा व वेशभूषा सविता शर्मा यांनी साकारली. या नाटकामध्ये नीलेश राऊत, प्रज्ञा वाघ, संग्राम भालेराव, प्रथमेश गांगल, शैलेंद्र पाटील, छकोल शिंदे, रूपाली सकपाळ, प्रियांका धंदर, सविता शर्मा, शुभांगी बोरकर आदींनी भूमिका निभावल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 27/Jan/2026














