रत्नागिरी : ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंड मधील विद्यार्थ्यांनी मालगुंड ग्रामपंचायत ते प्रशाला अशी भव्य शोभायात्रा काढून मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला.
दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर तसेच पर्यवेक्षक उमेश केळकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली शोभायात्रा शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने साकार झालेली अशी ही भव्य दिव्य शोभायात्रा वेगवेगळ्या देखाव्यांसह साकार झाली. या वर्षी या शोभा यात्रेची थीम होती विविधतेतून एकतेचा जल्लोष, या मध्ये वेगवेगळ्या वेशभूषेतील विद्यार्थी विद्यार्थीन सहभागी झाल्या होत्या आणि फिर भी दिल है हिंदुस्थानी, चक दे इंडिया या देशभक्तीपर गीतांवर ठेका धरून मालगुंड ग्रामपंचायत ते प्रशाला अशी ही भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष सुनिल ऊर्फ बंधू मयेकर यांच्या हस्ते ध्वज फडकवला गेला. व भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. तसेच प्रशालेतील एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी शानदार संचालन करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. त्यानंतर हे सर्व विद्यार्थी मालगुंड ग्रामपंचायत येथे ध्वजरहाण्यासाठी गेले व तिथून शोभायात्रेला सुरुवात झाली.
विविध प्रकारच्या वेशभूषेतील विद्यार्थी शोभायात्रेत सहभागी
या शोभायात्रे मध्ये कोळी, आदिवासी धनगर, वारकरी,शेतकरी गुजराती, बंगाली, दक्षिण भारतीय, लेझीम पथक तसेच साहित्य कवायत करणारे विद्यार्थी अशा विविध प्रकारच्या वेशभूषेतील विद्यार्थी गीतांच्या बोलावर ठेका धरून थिरकत होते. आणि विविधतेतून एकतेचा संदेश देत होते.
शोभायात्रेतून जिवंत देखावे सुद्धा साकारण्यात आले होते. या मध्ये स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ या छोट्या शिवबाला स्वराज्याचे धडे देताना असा जिवंत देखावा साकारण्यात आला होता. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची कैद आणि कांतारा चित्रपटातील वेशभूषेतील विद्यार्थी विशेष आकर्षणाचा विषय ठरले.
शोभायात्रेच्या माध्यमातून आणखीही काही जिवंत देखावे तयार करण्यात आले होते या जिवंत देखाव्यांमध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची कैद झाल्या नंतर त्यांचे कशा पद्धतीने हाल करण्यात आले होते, हे दाखवणारे व्यक्तिचित्र साकारण्यात आले होते. तसेच कांतारा चित्रपटातील वेशभूषेतील विद्यार्थी हे देखील जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून दाखविण्यात आले होते.
सुमारे दोन ते अडीज तासापेक्षा जास्त वेळ चाललेली ही शोभायात्रा मालगुंड परिसरातील ग्रामस्थांच्या डोळ्याचे पारणे फेडत होती, रस्त्याच्या कडेला उभे असलेले ग्रामस्थ, पालक तसेच पर्यटक देखील थांबून या शोभायात्रेचा आनंद घेत होते तसेच या सर्व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करीत होते त्यांना प्रोत्साहन देत होते.
या शोभायात्रेमध्ये मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष सुनिल ऊर्फ बंधू मयेकर उपाध्यक्ष विवेक परकर सचिव विनायक राऊत खजिनदार संदीप कदम सहसचिव श्रीकांत मेहेंदळे तसेच निमंत्रित संचालक विलास राणे, सल्लागार मंडळाचे सदस्य नंदकुमार डिंगणकर तसेच परिसरातील असंख्य पालक, ग्रामस्थ, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 27/Jan/2026














