रत्नागिरी : जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींपैकी अनेक ग्रामपंचायतींची फेब्रुवारी अखेर मुदत संपणार आहे. त्यानंतर काही दिवसांतच निवडणुकीची घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवरच ‘बंधित’चा २३ कोटी ७३ लाख ४७ हजार २६३ रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. यामध्ये ७६६ ग्रामपंचायतींसह आगामी कालावधीत मुदत संपणाऱ्या सरपंच, सदस्यांना पुढील निवडणुकीच्या तयारीसाठी ‘खर्च’ करण्याची ही आयती संधी चालून आल्याचे बोलले जात आहे.
पंधराव्या वित्त आयोगांतर्गत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या बंधित निधीचा पहिला हप्ता मिळाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ९ पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ७६६ ग्रामपंचायतींना सुमारे २३ कोटी ७३ लाख ४७ हजार २६३ रुपयांचा निधी मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून हा निधी तालुकानिहाय ग्रामपंचायतींना वितरित केलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तीनही स्तरांसाठी दरवर्षी बंधितचे दोन आणि अबंधितचे दोन अशा चार टप्प्यात निधी दिला जातो.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांना निधी नाही
शासनाने जिल्ह्यातील ७६६ ग्रामपंचायतींना उपलब्ध करून दिलेल्या ३२ कोटी ७४ लाखांचा बंधित निधी हा स्वच्छता अणि हागणदारीमुक्त देखभाल दुरुस्तीसाठी करायचा आहे. पेयजल पाणीपुरवठा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर रिसायकलिंगवरही हा निधी खर्च करणे अपेक्षित आहे. २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत किमान ५० टक्के हा निधी खर्च करावयाचा आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये प्रशासक असल्याने त्यांना या टप्प्यातही निधी मिळालेला नाही. निवडणुकीनंतरच त्यांना हा निधी मिळणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 27/Jan/2026














