लांजा : रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी आणि आपल्या आणि आपल्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबासाठी प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. तर विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने नाही तर उजव्या बाजूने चालावे असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरीचे वाहन निरीक्षक गजानन कोळी यांनी यांनी लांजा येथे केले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने सडक सुरक्षा जीवन रक्षा, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत वाहतुकीच्या नियमां संदर्भात लांजा हायस्कूल, लांजा वरिष्ठ महाविद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा डाफळेवाडी येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या तीनही ठिकाणी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमा संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये हेल्मेट का वापरावे, गाडीचा सीटबेल्ट का वापरावा, नॅशनल हायवे कसा ओळखावा, लायसन का असावे, वाहतुकीचे नियम आणि नियमांचे पालन कसे करावे? आधी संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
शनिवारी सकाळी लांजा हायस्कूल येथून शहरातून विद्यार्थी रॅली काढण्यात आली. ही रॅली लांजा हायस्कूल ते नगरपंचायत आणि पुन्हा नगरपंचायत ते लांजा हायस्कूल या पद्धतीने काढण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तर लांजा डाफळेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना देखील वाहतूक नियमां संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले.
या सर्व कार्यक्रमांना वाहन निरीक्षक सुरेश कंदकुर्तीकर तसेच गजानन कोळी, अवधूत कुंभार, अथर्व मोटर ट्रेनिंग स्कूलच्या संचालिका सौ. छाया मंदार गांगण, लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, महिला हेड कॉन्स्टेबल श्रीमती भुजबळराव, लांजा हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्री. आजगावकर, शिक्षक श्री. वाघाटे, अनिल कांबळे, लांजा वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य सुवर्ण देऊसकर, प्राध्यापक राहुल मराठे, धनंजय क्षीरसागर, डाफळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक मनोज रेडीज, नगरसेविका दुर्वा प्रसाद भाईशेट्ये, आदींसह विद्यार्थी पालक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 27/Jan/2026














