दापोलीत दुचाकी प्रकरणातील संशियत तरुणास अटक

दापोली : शहरातील रसिकरंजन नाट्यगृह परिसरातून चोरीस गेलेल्या सुझुकी एक्सेस दुचाकी प्रकरणी दापोली पोलिसांनी तातडीची कारवाई करत एका तरुणास अटक केली आहे. या यशस्वी कारवाईमुळे दापोली शहरात वाढत चाललेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जालगाव येथील रहिवासी व व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर असलेल्या जितेंद्र काशिनाथ चव्हाण यांनी त्यांची पांढऱ्या रंगाची सुझुकी एक्सेस १२५ सीसी (क्रमांक MH 08 AS 8996) दुचाकी २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता रसिकरंजन नाट्यगृहाशेजारील श्री समर्थ अर्थमुव्हर्स दुकानासमोरील मोकळ्या जागेत उभी केली होती. काही वेळाने परत आल्यानंतर सदर दुचाकी गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीनुसार दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान परिसरातील CCTV फुटेज तपासले असता संशयित व्यक्ती आढळून आली, ज्याच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.

दरम्यान, २३ जानेवारी २०२६ रोजी रात्री दापोली पोलीस ठाणे हद्दीतील हर्णे परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले. किरण संतोष हिलम (वय २२), रा. माणगाव, दत्तनगर, आदिवासीवाडी, ता. महाड, जि. रायगड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चौकशीदरम्यान आरोपीने सदर दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या माहितीनुसार मेमोरंडम पंचनाम्याद्वारे चोरीस गेलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे.

सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्याला न्यायालयात रिमांडसाठी हजर करण्यात येणार आहे. आरोपीने यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास दापोली पोलीस सखोलपणे करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 27/Jan/2026