रत्नागिरी: आरे-नागझरी ग्रामस्थांचा आदर्श; लोकसहभागातून उभारला स्मशानभूमीचा रस्ता, सरकारी निधीची वाट न पाहता सोडवली वर्षानुवर्षांची अडचण

रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी तालुक्यातील आरे-नागझरी येथील ग्रामस्थांनी एकजुटीचे बळ दाखवत गावासमोर असलेला एक मोठा प्रश्न मार्गी लावला आहे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन निधी जमा केला आणि श्रमातून रस्ता उभारून सर्वांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

वर्षानुवर्षांची गैरसोय आणि ग्रामस्थांचे हाल

रत्नागिरी-गणपतीपुळे या मुख्य पर्यटन मार्गावर आरे-नागझरी हे गाव वसलेले आहे. या गावातील स्मशानभूमी आरे-वारे समुद्रानजीक मुख्य रस्त्याच्या अगदी बाजूला आहे. स्मशानभूमी रस्त्याला लागून असूनही, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य असा रस्ता उपलब्ध नव्हता. पावसात किंवा चिखलाच्या वेळी अंत्यविधीसाठी जाताना ग्रामस्थांना प्रचंड हाल सोसावे लागत होते. ही समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती.सरकारी निधीची वाट न पाहता उचलले पाऊलशासकीय निधीची किंवा प्रशासकीय मंजुरीची वाट पाहत न बसता, गावाची ही अडचण दूर करण्याचा निर्णय आरे-नागझरीतील ग्रामस्थांनी घेतला. गावाने एकजुटीने पुढाकार घेत रस्ता उभारणीसाठी निधी जमा करण्याचे ठरवले. प्रत्येक ग्रामस्थाने आपल्या क्षमतेनुसार या कामासाठी वर्गणी दिली. अल्पावधीतच आवश्यक निधी जमा झाला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.

लोकसहभागातून रस्त्याची निर्मिती

जमा झालेल्या निधीतून ग्रामस्थांनी नियोजनबद्धरीतीने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. सध्या हा रस्ता कच्च्या स्वरूपात तयार करण्यात आला असून, यामुळे आता अंत्यविधीसाठी जाताना होणारी अडचण दूर झाली आहे. भविष्यात याच रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा संकल्पही ग्रामस्थांनी बोलून दाखवला आहे.

पंचक्रोशीत होतेय ग्रामस्थांचे कौतुक

“गावाचा विकास केवळ सरकारवर अवलंबून न राहता लोकसहभागातूनही होऊ शकतो,” हे आरे-नागझरीच्या ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या कामाचे रत्नागिरी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे. एकी आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, याचेच हे उत्तम उदाहरण ठरले आहे.