रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी पोलीस दलाच्या सायबर विभागाने सव्वा कोटी रुपयांच्या सायबर फसवणूक प्रकरणातील एका मुख्य आरोपीला मुंबईतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली फिर्यादींना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश केल्यामुळे रत्नागिरी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातला गंडा
या गुन्ह्यातील आरोपीने स्वतःची ओळख बेंगलोर पोलीस आणि नवी दिल्ली येथील सी.बी.आय. (CBI) अधिकारी म्हणून करून दिली होती. फिर्यादी यांचे मुंबईतील कॅनरा बँकेच्या माटुंगा शाखेत खाते असून त्यामधून ३ कोटी रुपयांचा फ्रॉड झाला असल्याची भीती आरोपीने घातली. या गुन्ह्यात तुम्हाला ‘डिजिटल अरेस्ट’ (Digital Arrest) करण्यात आले आहे, असे सांगून आरोपीने ४ नोव्हेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत वेळोवेळी पैशांची मागणी केली. या धाकाला बळी पडून फिर्यादीने तब्बल १,२३,००,००० (एक कोटी तेवीस लाख) रुपये आरोपींच्या हवाली केले होते.
तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसांची गुप्त मोहीम
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून दापोली पोलीस ठाण्यात (गुन्हा रजि. नं. ०७/२०२६) भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. रत्नागिरी सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि बँकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. तपास पथकाने मुंबई आणि ठाणे येथे स्थानिक बातमीदारांचे जाळे विणून २३ जानेवारी २०२६ रोजी एका आरोपीला ताब्यात घेतले. न्यायालयाने या आरोपीला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रत्नागिरी पोलीस दलाची यशस्वी कामगिरी
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता सुतार, पोलीस हवादार संदीप नाईक, सौरभ कदम, रोहन कदम, निलेश शेलार यांच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. या प्रकरणातील इतर दुव्यांचा शोध सायबर पोलीस घेत आहेत.
रत्नागिरी पोलिसांचे नागरिकांना आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांनी नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन केले आहे. “कोणीही पोलीस, सीबीआय किंवा नॅशनल सिक्युरिटी विभागाचा अधिकारी असल्याचे सांगून तुमचे बँक खाते किंवा सिमकार्डचा गैरवापर झाल्याची भीती घालत असेल, तर घाबरू नका. अशा ‘डिजिटल अरेस्ट’च्या धमक्यांना बळी पडू नका किंवा कोणालाही पैसे ट्रान्सफर करू नका,” असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आपली वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.














