रत्नागिरी (प्रतिनिधी): नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राज्याचे मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेचा निषेध म्हणून रत्नागिरी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या भाषणावरून वाद
२६ जानेवारी २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मात्र, या भाषणादरम्यान त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा कुठेही उल्लेख केला नाही. राज्यघटनेच्या अंमलबजावणीचा दिवस असलेल्या प्रजासत्ताकदिनीच शिल्पकारांच्या नावाचा विसर पडणे हा अपमान असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
मंत्र्यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी
या प्रकारामुळे रत्नागिरी तालुका वंचित बहुजन आघाडीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. मंत्र्यांनी जाणीवपूर्वक नाव टाळल्याचा आरोप करत, सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि संबंधित मंत्र्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
माधवी जाधव यांच्यावरील कारवाईला विरोध
नाशिक येथील याच कार्यक्रमात शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या महिला अधिकारी (फॉरेस्ट विभाग) श्रीम. माधवी जाधव यांनी मंत्री महोदयांच्या या कृत्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. जाधव यांनी केलेल्या निषेधामुळे त्यांच्यावर कोणतीही दडपशाही किंवा कारवाई करू नये, अशी भूमिकाही पक्षाने मांडली आहे. जर त्यांच्यावर सूडबुद्धीने बदली किंवा इतर कारवाई केल्यास आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देताना जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र उर्फ राजू जाधव, रत्नागिरी तालुका अध्यक्ष राजेंद्र कांबळे आणि तालुका महासचिव बिपिन आयरे उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 28/Jan/2026














