PM Modi Remembers Ajit Pawar After His Demise: महाराष्ट्राच्या राजकारणात आज काळा दिवस ठरला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं बारामतीत विमान अपघातात निधन झालं.
त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण राज्याला हादरा बसला. एक धडाडीचे नेते म्हणून अजित पवार यांची ओळख होती. दरम्यान, आज सकाळी विमान लँडिंगवेळी त्यांचं अपघाती निधन झालं. या विमानात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबासह नेते मंडळींना अश्रू अनावर झाले. नेतेमंडळींनी पोस्ट शेअर दु:ख व्यक्त केलं, तसेच श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करून श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट शेअर करून अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करून दु:ख व्यक्त केलं. नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्यासोबतचे फोटो शेअर केले. तसेच कॅप्शनद्वारे श्रद्धांजली वाहिली. “अजित पवार हे जनतेचे नेते होते. त्यांचे तळागाळातील लोकांशी मजबूत संबंध होते. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात होता. प्रशासकीय बाबींबद्दलची त्यांची समज आणि गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याची त्यांची आवड देखील उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन झाले, हे खूप धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना माझ्या संवेदना. ओम शांती”. नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टद्वारे अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
अजित पवार यांच्या निधनानंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली. “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाचे वृत्त ऐकून मला तीव्र धक्का बसला. त्यांचे निधन हे वेदनादायी आहे. आपल्या संपूर्ण सार्वजनिक जीवनात त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी समर्पित भावनेनी कार्य केले. त्यांना सर्वजण प्रेमाने ‘दादा’ म्हणत असत. जनतेप्रति असलेले प्रेम, तळमळ आणि लोकसेवेची निष्टा यासाठी ते ओळखले जात. त्यांच्या निधनावर मी अंतःकरणातून शोक व्यक्त करतो. त्यांचे कुटुंबीय, हितचिंतक आणि त्यांच्याबद्दल प्रेम असलेले सर्व लोक या दुःखातून सावरावेत यासाठी मी प्रार्थना करतो”.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 28-01-2026














