Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. कडाक्याची थंडी हळूहळू ओसरत असतानाच आता राज्यावर अवकाळी पावसाचं संकट घोंगावत आहे. (Maharashtra Weather Update)
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह उत्तर भारतातील पश्चिमी चक्रावात आणि वाऱ्यांच्या बदललेल्या दिशेमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.(Maharashtra Weather Update)
तापमानात मोठे चढ-उतार
गेल्या २४ तासांत राज्याच्या किमान व कमाल तापमानात मोठी तफावत दिसून आली आहे. मंगळवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३३.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
राजस्थानमधील अलवार येथे ४.५ अंश सेल्सिअस इतके निचांकी तापमान नोंदले गेले, तर केरळमधील कोट्टायम येथे देशातील सर्वाधिक ३६.० अंश सेल्सिअस तापमान राहिले. या बदलत्या हवामानामुळे महाराष्ट्रातही तापमानात चढ-उतार सुरूच राहणार असल्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट
हवामान विभागाने मराठवाड्यातील जालना आणि परभणी जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांमध्येही ढगाळ वातावरण कायम राहणार आहे.
विदर्भात ढगाळ हवामान, धुक्याची शक्यता
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळेल. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून पहाटेच्या वेळी धुक्यामुळे दृश्यमानता कमी होऊ शकते. त्यामुळे वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात ढगांची गर्दी
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. काही भागांत हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. पहाटेच्या वेळी धुक्याचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता असून सकाळी गारवा तर दुपारनंतर उकाडा जाणवू शकतो.
कोकणात उकाड्याची शक्यता
कोकण किनारपट्टीवर सकाळच्या वेळी धुक्याची चादर दिसून येईल. दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहणार असून आर्द्रतेत वाढ झाल्याने उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.
शेतीवर परिणाम होण्याची भीती
मंगळवारी राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. आजही हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः द्राक्ष, आंबा आणि गहू या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
हवामानातील हा बदल पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी हवामान अंदाजावर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 28-01-2026














