Eknath Shinde on Ajit Pawar Death: ‘मोठा भाऊ गमावला.. संपूर्ण महाराष्ट्राचं न भरुन निघणारं नुकसान..’ अजित पवारांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

Eknath Shinde on Ajit Pawar Death: महाराष्ट्राच्या राजकारणात बुधवारची सकाळ वाईट ठरली. बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या आज बारामती येथे सभा होणार होत्या. त्या सभांसाठी आज सकाळी अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामती येथे येत होते. हे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना अपघात होऊन जवळच्या शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. यावर प्रतिक्रिया देताना, आपला मोठा भाऊ गमावल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“मनाला वेदना आणि चटका देणारी घटना आहे. अजित दादा इतक्या लवकर आपल्याला सोडून जातील असा विचारही कुणी केला नसेल. अजित दादा गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्त्व करत होते. अतिशय परखड, स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे. प्रत्येक गोष्टीवर बारीक अभ्यास करुन बोलण्याची सवय होती. चूक त्याला चूक म्हणणारे असले तरी ते मनाने निर्मळ होते याचा अनुभव मीही घेतलेला आहे. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं. एकदा कोणतीही गोष्ट करायची ठरवली की ते करायचेच. आम्ही टीम म्हणून महाराष्ट्रासाठी काम केलं. अजित दादांनी सकाळी ६ वाजताही लोकांना भेटत असत. वेळेचं भान ठेवणारा नेता हरपला आहे. परवाच आमची एका कार्यक्रमात भेट झाली होती. आज सकाळी जेव्हा घटना कळली तेव्हा परवाच्याच भेटीची दृश्य समोर येत होती. वयाने आणि अनुभवाने ते माझ्यापेक्षा मोठे होते. त्यामुळे त्यांना राज्यातील प्रत्येक विभागाचा अभ्यास दांडगा होता. त्यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबाचंच नाही संपूर्ण महाराष्ट्राचं न भरुन निघणारं नुकसान झालेलं आहे. एक मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात आहे,” अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.

विमानाचे लँडिंग चुकले… ६ जणांचा मृत्यू

अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने दिलेली माहिती अंगावर शहारे आणणारी आहे. त्यांनी सांगितले की, “स्वतःच्या डोळ्यांनी हा अपघात पाहिला. खूप दुःखद घटना होती. विमान लँडिंगसाठी खाली येत होते, तेव्हाच काहीतरी अघटित घडणार याची जाणीव झाली. विमान खाली येताना वाटत होतं की ते कोसळेल आणि तितक्यातच ते कोसळले आणि त्यात फोटो स्फोट झाला. आम्ही मदतीसाठी धावलो, पण विमानाने भीषण पेट घेतला होता. आम्ही जवळ पोहोचलो तेव्हा विमानात एकापाठोपाठ एक ४ ते ५ भीषण स्फोट झाले.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 28-01-2026