Chiplun : खेर्डीत दोन सदनिका फोडून ७ तोळे सोन्यासह रोकड लंपास

चिपळूण : शहरानजीकच्या खेर्डी येथील एका इमारतीतील दोन सदनिकांमध्ये मध्यरात्री घरफोडी करत चोरट्यांनी तब्बल ७ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

या चोरीतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पाच जणांची टोळी या घरफोडीमागे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सलग एका आठवड्यात घडलेली ही दुसरी घरफोडीची घटना चिपळूण पोलिस यंत्रणेसाठी मोठे आव्हान ठरत आहे. खेर्डी बाजारपेठे लगत असलेल्या एका इमारतीत मयूर खेतले यांच्या सदनिकेचा मुख्य दरवाजा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. खेतले कुटुंबीय गावी गेले असल्याने घरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी कपाटे फोडून ६ ते ७ तोळे सोन्याचे दागिने व सुमारे ७हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सावंत कुटुंबियांची सदनिकाही चोरट्यांच्या निशाण्यावर आली. त्यांच्या घरातूनही रोख रक्कम चोरीस गेल्याचे समोर आले आहे. सकाळी ही बाब निदर्शनास येताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 28/Jan/2026