“दादा गेले!…” : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – दादा गेले! जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे.

मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवारांचं जाणं हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे. मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य ४ जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. माझे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत आणि बारामतीला जातोय असं त्यांनी सांगितले.

तसेच अजित पवारांसारखे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासात ते महत्त्वपूर्ण योगदान देत होते, त्या काळात त्यांचे निघून जाणे हे अविश्वसनीय आणि मनाला चटका लावणारे आहे. अजित पवार महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जाण असलेला हा नेता होता. त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अतिशय संघर्षशील असं नेतृत्व होते. सर्व परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्व होते असंही फडणवीसांनी म्हटलं.

अजित पवारांनी दिला होता अखेरचा सल्ला

दरम्यान, राजकारण लय वंगाळ आहे. जमिनीचे पैसे आले असतील तर राजकारणात पडू नका. धंदा-पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा आणि निर्व्यसनी जीवन जगा. काहींना जमिनीचे पैसे आले की लगेच राजकारणात उडी घ्यायची हौस होते. बायकोला उभं करा, तू निवडणूक लढ..असं करू नका. पैसे संपले की काय करणार? दोन हाताला चुना लावून ‘ठो-ठो’ करणार? त्याचा काहीच उपयोग नाही, साधुसंतांनीही आपल्याला तेच सांगितले असल्याचे नमूद करत अजित पवारांनी “धंदा-पाणी सांभाळा, आयुष्य नीट जगा असा सल्ला अजित पवारांनी मृत्यूपूर्वी दिला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:26 28-01-2026