रत्नागिरी : कोणत्याही कामाबाबत ऑन द स्पॉट निर्णय घेणारे नेतृत्त्व आपल्यातून हरपले आहे, अशी भावूक प्रतिक्रिया व्यक्त करत महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
आपली राजकीय कारकीर्द सुरू होताना पहिली १५ ते २० वर्षे अजितदादांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रभर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी राजकारणापलिकडचे संबंध होते आणि आम्ही दोघांनीही ते जपले होते. आमच्यातील राजकीय आणि विकासकामांसोबतच खेळीमेळीच्या चर्चाही सातत्याने होत असत, असे मंत्री सामंत म्हणाले.
पुणे एमआयडीसीबाबतच्या एका विषयावरुन मंगळवारी दिवसभरात आमची तीनवेळा फोनवरुन चर्चा झाली. सायंकाळी ७ वाजता आमचे शेवटचे बोलणे झाले. त्यानंतर आज बुधवारी सकाळी अशी धक्कादायक बातमी कानावर येईल, असे वाटले नव्हते, असे त्यांनी सांगितले.
कोणतेही काम समोर आल्यानंतर करतो, बघतो असे सांगण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. ऑन द स्पॉट काम करणारे नेतृत्त्व हीच त्यांची ओळख होती आणि म्हणूनच अशा नेत्याने निरोप घेणं हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी खूप मोठे नुकसानकारक आहे, असेही मंत्री सामंत म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:53 28-01-2026














