उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राला धक्का बसला. त्यांच्या अपघाती मृत्युने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही दुःख अनावर झाले. “माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला.
अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते”, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला पोहोचणार होते. पण, विमानतळावर उतरतानाच त्यांचे विमान कोसळले. या भीषण अपघातात, अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “ते सर्वार्थाने ‘दादा’ होते”
अजित पवार यांच्या निधनानंतर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला! मी मुख्यमंत्री असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते.”
“एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“महाराष्ट्रात ते ‘दादा’ म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. ते सर्वार्थाने ‘दादा’ होते. दादांना माझ्यातर्फे, ‘ठाकरे’ व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली”, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शोक व्यक्त केला.
“ही बातमी धक्कादायक, शब्दच नाहीत”
आदित्य ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, “अजित दादांची बातमी ही धक्कादायक आहे! शब्दच नाहीत. दादांसोबत गेले ५-६ वर्षं काम करण्याची संधी मिळाली… पहिलं सरकारमध्ये आणि नंतर काही दिवस विरोधी पक्षात.”
“त्यांची विधिमंडळ कारभारावर असलेली रुबाबदार पकड आणि प्रेमळ स्वभाव हा आमच्यासारख्या अनेकांना आवडायचा. मी हे विरोधी पक्षात असताना देखील अनेकदा जाहीरपणे म्हटलं होतं. आजची बातमी खरंच धक्का देणारी आहे. अजित दादांना आणि दुर्घटनेतील त्यांच्या सहकाऱ्यांना विनम्र श्रद्धांजली”, अशा शब्दात त्यांनी अजित पवारांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:53 28-01-2026














