धक्कादायक योगायोग! अजितदादांच्या निधनानंतर पोहोचले शुभेच्छा पत्र; आ. किरण सामंत यांना अश्रू अनावर

रत्नागिरी : राज्याच्या राजकारणातून आज एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असतानाच, रत्नागिरीत एक हृदयस्पर्शी आणि चटका लावून जाणारा प्रसंग घडला आहे.
आमदार किरण सामंत यांना अजितदादांनी पाठवलेले वाढदिवसाच्या शुभेच्छांचे पत्र आज टपालाने मिळाले, मात्र हे पत्र वाचताना आज स्वतः ‘दादा’ या जगात नाहीत.

व्यस्ततेतून जपलेलं नातं
आमदार किरण सामंत यांचा वाढदिवस ७ जानेवारी रोजी साजरा झाला. त्या वेळी आपल्या व्यस्त कामकाजामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सामंत यांची प्रत्यक्ष भेट घेता आली नव्हती. मात्र, आपल्या सहकाऱ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी शुभेच्छांचे पत्र पाठवले होते.

पत्राचा प्रवास आणि दुर्दैवी योगायोग
टपालाने प्रवास करत हे पत्र आज रत्नागिरीत किरण सामंत यांच्या हाती पडले. पत्रावर अजितदादांच्या शुभेच्छा आणि स्वाक्षरी पाहून सामंत भावूक झाले. मात्र, नियतीचा खेळ असा की, ज्या दिवशी हे पत्र मिळाले, त्याच दिवशी सकाळी अजितदादांच्या अपघाती निधनाची वार्ता धडकली.
“दादांच्या कामाची पद्धत आणि सहकाऱ्यांप्रती असलेली आपुलकी या पत्रातून दिसते. पण हे पत्र हातात असताना दादा आपल्यात नाहीत, हे स्वीकारणे खूप कठीण आहे,” अशा शब्दांत आमदार किरण सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आज मिळालेले हे पत्र आता केवळ शुभेच्छा नसून अजितदादांच्या आठवणींचा एक अमूल्य ठेवा बनले आहे. या घटनेमुळे रत्नागिरीतील राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.