चिपळूण : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. चिपळूणमध्ये देखील अनेकांनी हळहळ व्यक्त केली. चिपळूण तालुका व्यापारी संघातर्फे बुधवारी दुपारनंतर बाजारपेठ बंद ठेवून उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. चिपळूणसह खेर्डी, सावर्डे या भागातील बाजारपेठ दुपारपासून बंद ठेवण्यात आली. शहर बाजारपेठेतील मध्यवर्ती बसस्थानक, चिंचनाका जुना बसस्थानक, पानगल्ली, भेंडीनाका आदी भागात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने दुपारी २ वा. बंद केली. तसेच मार्कंडी, बहादूरशेख चौक, खेर्डी, सावर्डे या भागात देखील कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे शहर परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवस दुखवटा व बुधवारी शासकीय सुट्टी जाहीर केल्याने अनेक शाळा, महाविद्यालये सोडण्यात आली. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या शाळा देखील सोडण्यात आल्या. शहरात रिक्षा वाहतुकीसह रोटरॅक्ट आयोजित फन फेअरही बंद ठेवण्यात आला. शहरातील सर्वच प्रकारची दुकाने बंद होती. केवळ मेडीकल सुरू होती. व्यापारी संघाचे अध्यक्ष किशोर रेडीज, उदय ओतारी, संदीप लवेकर, शिरीष काटकर यांनी केलेल्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 29/Jan/2026














