अजितदादांच्या निधनाने रत्नागिरीवर शोककळा; बाजारपेठा बंद

रत्नागिरी/चिपळूण: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त धडकताच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रत्नागिरी शहर, चिपळूणसह जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठा बुधवार दुपारनंतर कडकडीत बंद ठेवण्यात आल्या. जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत मोठे योगदान देणाऱ्या ‘दादां’च्या निधनामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

व्यापारी संघटनांचा उत्स्फूर्त दुखवटा

अजित पवार यांचे निधन झाल्याचे अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर रत्नागिरीतील व्यापारी बांधवांनी आपले व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले. चिपळूणमध्ये चिपळूण व्यापारी महासंघटना आणि एकता व्यापारी संघटना यांची तातडीची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत आज दुपारी २ वाजल्यापासून संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.

  • शाळा-महाविद्यालयांना सुट्टी: निधनाचे वृत्त समजताच सर्व शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांना तातडीने सुट्टी जाहीर करण्यात आली.
  • श्रद्धांजली फलक: जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात, प्रमुख चौकांमध्ये अजितदादांना श्रद्धांजली वाहणारे फलक झळकले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रत्नागिरी दौरा रद्द

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. महायुतीच्या प्रचारासाठी त्यांच्या भव्य सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील सर्व प्रचारसभा आणि दौरे तातडीने रद्द करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस कालच पवार कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी बारामतीकडे रवाना झाले होते.

प्रशासकीय आणि राजकीय स्तब्धता

रत्नागिरी जिल्ह्याला, विशेषतः मिऱ्या बंधाऱ्यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना शेकडो कोटींचा निधी देणाऱ्या अर्थमंत्र्यांच्या निधनाने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. “एक कार्यक्षम प्रशासक आणि कोकणचा मित्र हरपला,” अशा भावना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

दुखवटा सूचना: राज्य सरकारने जाहीर केलेल्या तीन दिवसांच्या शासकीय दुखवट्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यक्रम आणि उत्सव रद्द करण्यात आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 29-01-2026