रत्नागिरी: रत्नागिरी नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी आपल्या पदाची धुरा सांभाळताच घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे. नगरपालिकेच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीचे भान राखत, जोपर्यंत पालिकेची स्थिती सुधारत नाही, तोपर्यंत कोणत्याही शासकीय सेवा-सुविधेचा लाभ घेणार नाही, असा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे जनमानसातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
नगराध्यक्षांच्या गाडीचा त्याग; स्वतःच्या खाजगी वाहनाने प्रवास
नगराध्यक्षांनी आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. याचे पहिले पाऊल म्हणून त्यांनी नगरपालिकेच्या नगराध्यक्षांसाठी राखीव असलेल्या शासकीय गाडीचा वापर पूर्णपणे थांबवला आहे. सध्या त्या पालिकेच्या सर्व कामांसाठी स्वतःच्या खाजगी गाडीचा वापर करत आहेत. नगरपालिकेचा इंधन आणि देखभालीचा खर्च वाचवण्यासाठी त्यांनी हा पुढाकार घेतला असून, “अनावश्यक खर्च टाळणे” हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रभागांच्या स्वच्छतेवर विशेष भर
शहराच्या सौंदर्यीकरणासोबतच स्वच्छतेच्या मुद्द्याला शिल्पा सुर्वे यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्वच्छतेचे सुयोग्य नियोजन करून त्यांनी प्रत्येक प्रभागात ५ स्वच्छता कर्मचारी नियुक्त केले आहेत. या नियोजनामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रभागांमधील स्वच्छतेचा प्रश्न सुटताना दिसत असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
प्रशासकीय कारभाराला लागणार शिस्त
गेल्या पाच वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत नगरपालिकेच्या कारभारातील शिस्त काहीशी बिघडली होती. ही शिस्त पुन्हा लावण्यासाठी शिल्पा सुर्वे यांनी कंबर कसली आहे. एक आदर्श शिक्षिका आणि एक गृहिणी अशा दोन्ही भूमिकांमधील शिस्त आणि नियोजनबद्धता त्यांच्या कामातून दिसून येत आहे. फाईल्सचा निपटारा करण्यापासून ते कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीपर्यंत सर्वच बाबतीत आता पारदर्शकता आणि शिस्त येताना दिसत आहे.
जनमानसातून उमटतेय कौतुकाची थाप
शिल्पा सुर्वे यांच्या या कार्यपद्धतीवर रत्नागिरीकर नागरिक अत्यंत खुश आहेत. “एका गृहिणीची काटकसर आणि शिक्षिकेची शिस्त जर पालिकेच्या कारभारात आली, तर रत्नागिरी नगरपालिकेचा नक्कीच कायापालट होईल,” अशी प्रतिक्रिया सध्या शहरात उमटत आहे.














