बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने देश हादरला आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राम मोहन नायडू यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनंतर आता या अपघाताभोवती संशयाचे जाळे निर्माण झाले आहे. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या लँडिंगच्या शेवटच्या टप्प्यात नेमकं काय बिनसलं? याबाबत तज्ज्ञांनी पाच प्रमुख प्रश्न उपस्थित केले आहेत.
१. ‘परवानगी’ आणि ‘अपघात’ मधील तो एक मिनिट!
सकाळी ८:४३ ला वैमानिकाला लँडिंगची अधिकृत परवानगी मिळाली आणि ८:४४ ला विमानाने पेट घेतला. अवघ्या एका मिनिटाच्या अंतरात विमानात अशी कोणती आणीबाणी (Emergency) निर्माण झाली की वैमानिकाला संकटाची पुष्टीही करता आली नाही? सिस्टीम अचानक फेल झाली की कॉकपिटमध्ये काही अकल्पनीय घडलं? हा तपासाचा मुख्य केंद्रबिंदू आहे.
२. दाट धुके असताना लँडिंगचा जुगार का?
मंत्र्यांनी मान्य केलं की दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी होती. पहिल्या प्रयत्नात धावपट्टी दिसत नसल्याने विमान हवेत फिरवण्यात आले (Go-around). बारामतीसारख्या अनियंत्रित (Uncontrolled) विमानतळावर, जिथे ‘इन्स्ट्रुमेंट लँडिंग’ची सोय नाही, तिथे अशा हवामानात दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न का केला गेला? विमान पर्यायी विमानतळाकडे का वळवण्यात आले नाही?
३. अचानक तुटलेला रेडिओ संपर्क
लँडिंग मिळेपर्यंत वैमानिक आणि एटीसी यांचा संवाद सुरळीत होता. मात्र, अंतिम परवानगी मिळताच रेडिओ संपर्क का तुटला? विमानात अचानक लागलेली आग किंवा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे हा संपर्क तुटला असावा का?
४. तांत्रिक बिघाड की बाह्य घटक?
विमानाकडे सर्व वैध प्रमाणपत्रे होती. असे असतानाही विमानाला अचानक आग कशी लागली? इंजिन फेल्युअर, पक्षी धडकणे (Bird Hit), इंधन गळती की हार्ड लँडिंगमुळे विमानाने पेट घेतला? ब्लॅक बॉक्समधील डेटा या प्रश्नाचे उत्तर देईल.
५. ‘एसओपी’चे उल्लंघन झाले का?
कमी दृश्यमानता असताना लँडिंग करताना मानक कार्यप्रणाली (SOP) पाळली गेली का? विमान धावपट्टीवर उतरताना त्याचा वेग (Approach Speed) आणि उंची योग्य होती का? की घाईघाईत लँडिंग करण्याचा प्रयत्न नडल्याची शक्यता आहे?
तज्ञ वैमानिकांचा दुर्दैवी अंत
या अपघातात केवळ एक नेताच नाही, तर अनुभवी वैमानिकही गमावले आहेत:
- कॅप्टन सुमित कपूर: १५,००० तासांचा दांडगा उड्डाण अनुभव.
- कॅप्टन शांभवी पाठक: १,५०० तासांचा अनुभव असलेल्या सह-वैमानिक.
- इतर मृत: पीएसओ विधीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माली.
पुढील दिशा: नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि डीजीसीए (DGCA) यांनी ‘ब्लॅक बॉक्स’ विश्लेषणाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. या तांत्रिक अहवालातूनच महाराष्ट्राच्या या ‘सारथ्या’चा घात कशामुळे झाला, याचे सत्य समोर येईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 29-01-2026














