रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील नाचणे (म्यु. बाहेर) ता. जि. रत्नागिरी येथील सर्वे नं. ३९८ हि.नं. १/२/३ क्षेत्र १-१०-०० हे. आर. या जागेवर सुरू असलेल्या निवासी स्वरूपाच्या बांधकामाबाबत नियमभंग झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी जीवन देसाई यांनी संबंधित बांधकाम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी अशोक विठ्ठल नाचणकर (रा. आदर्शनगर, मिरजोळे) यांनी संबंधित बांधकाम मंजूर परवानगीतील अटी व शर्तीचा भंग करून करण्यात येत असल्याची तक्रार प्रशासनाकडे दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार रत्नागिरी यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत सामासिक अंतर न सोडता बांधकाम सुरू असल्याचे आढळून आले असून त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून प्रकल्प संचालक नगररचना विभाग, तहसीलदार रत्नागिरी व उपअधिक्षक भूमी अभिलेख यांना संयुक्त स्थळ पाहणी करून आदेश क्रमांकातील अटी व शर्तीचा भंग झाला आहे की नाही, याची पडताळणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
संबंधित जागेवर बांधकाम करणारे प्रविण विजय ओसवाल (रा. तेलीआळी, रत्नागिरी) यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४४ व ४५ तसेच संबंधित नियमांनुसार बांधकाम तात्काळ थांबवण्याचे व स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास तहसीलदार रत्नागिरी यांनी आवश्यक यंत्रसामुग्री मनुष्यबळासह प्रत्यक्ष जागेवर जाऊन बांधकाम थांबवण्याची अथवा काढून टाकण्याची कारवाई करावी तसेच त्यासाठी झालेला खर्च संबंधितांकडून जमीन महसूल थकबाकीप्रमाणे वसूल करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे. या कारवाईची माहिती जिल्हाधिकारी रत्नागिरी (महसूल शाखा), सहायक संचालक नगररचना, तहसीलदार रत्नागिरी व उपअधिक्षक भूमी अभिलेख यांना देण्यात आली असून पुढील तपास व कार्यवाही महसूल प्रशासनामार्फत सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 30/Jan/2026














