Khed : वेरळ परिसरात भूमिगत वाहिनी तुटल्याने वीज खंडित

खेड : तालुक्यातील वेरळ परिसरात खाजगी टेलिकॉम कंपनीच्या केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे महावितरणची भूमिगत हाय टेन्शन विद्युत वाहिनी तुटल्याची घटना शनिवारी घडली आहे. या प्रकारामुळे वेरळ, खेड रेल्वे स्टेशन सह परिसरातील वीजपुरवठा तब्बल नऊ ते दहा तासांहून अधिक काळ पूर्णतः खंडित झाला होता. रविवारी रात्री उशिरापर्यंत महावितरणकडून दुरुस्तीचे युद्धपातळीवर काम सुरू होते.

संबंधित टेलिकॉम कंपनीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दिलेल्या परवानगीनुसार महामार्गालगत सर्व्हिस रोडपासून ठराविक अंतर ठेवून सुमारे तीन फूट खोलीपर्यंतच खोदकाम करणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात संबंधित खाजगी टेलिकॉम कंपनीच्या ठेकेदाराकडून नियमांची पायमल्ली करत आरओडब्ल्यू (राईट ऑफ वे) पासून अवघ्या एक ते दोन फुटांवरच काही ठिकाणी खोदकाम करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच निष्काळजीपणामुळे महावितरणची भूमिगत विद्युत वाहिनी तुटल्याचे बोलले जात आहे.

या कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून संबंधित ठेकेदाराला तात्काळ काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तरीही खोदकाम सुरू ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे वेरळ परिसरातील खेड रेल्वे स्टेशन, व्यापारी गाळे, दुकाने तसेच लघुउद्योगांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. वीज बंद झाल्याने व्यवसाय ठप्प झाले.

दरम्यान, या घटनेबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, सर्वप्रथम वीजपुरवठा सुरळीत करणे हे आमचे प्राधान्य आहे. त्यानंतर संबंधित ठेकेदार व खासगी टेलिकॉम कंपनीवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 30/Jan/2026