खेड : मुंबई गोवा महामार्गावरील अपघातप्रवण भोस्ते घाटात गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एका ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन्ही मालवाहू ट्रक हे गोव्याहून मुंबईच्या दिशेने निघाले होते. भोस्ते घाट उतरत असताना पाठीमागून आलेल्या मालवाहू ट्रकने पुढे निघालेल्या ट्रकला पाठीमागे धडक दिली. त्यामध्ये पाठीमागून आलेल्या ट्रकमधील चालक गंभीर जखमी अवस्थेत ट्रकच्या केबिनमध्ये अडकला होता. त्याला वाहतूक पोलिस व पोलिस अंमलदारांनी नागरिकांच्या मदतीने मोठ्या शर्थीने बाहेर काढले. त्याला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत नोंद करण्याची कार्यवाही खेड पोलिस स्थानकात सुरू होती.
पोलिस अधीक्षकांची तत्परता
यादरम्यान रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे हे या मार्गावरून प्रवास करत होते. अपघात होताच त्यांनी तत्काळ आपली गाडी थांबवून स्वतः खाली उतरून बॉडीगार्ड व इतर वाहनचालकांच्या मदतीने केबिनमध्ये अडकलेल्या जखमी चालकाला सुरक्षित बाहेर काढले. रुग्णवाहिका बोलावून जखमीला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची सूचना केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 30/Jan/2026














