रत्नागिरी: रत्नागिरी नगरपालिकेतील प्रशासकीय राजवटीत झालेल्या कामांचे ‘नमुने’ आता एकामागून एक समोर येत आहेत. प्लास्टिक बंदीच्या जनजागृतीसाठी चक्क सार्वजनिक शौचालयात ‘कापडी पिशव्यांचे मशीन’ बसवण्याचा अजब प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे. या कामासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याने नगरपालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमका प्रकार काय?
‘स्वच्छ सर्वेक्षण प्रोत्साहनात्मक अनुदान’ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने नगरपालिकेने कापडी पिशव्या देणारे ‘कॉईन ऑपरेटेड क्लोथ बॅग वेंडिंग मशीन’ बसवण्याचे काम काढले होते. आश्चर्याची बाब म्हणजे, हे मशीन शहरातील राम आळी येथील सार्वजनिक शौचालयात बसवण्यात आले आहे.
१० लाखांची वर्क ऑर्डर आणि अवास्तव खर्च
या कामासाठी सुमारे १० लाख रुपयांची वर्क ऑर्डर देण्यात आली होती. ज्या ठिकाणी महिलांच्या आरोग्यासाठी ‘सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन’ आणि ‘डिस्पोजल मशीन’ बसवणे अत्यंत आवश्यक होते, त्या ठिकाणी प्रशासनाने चक्क कापडी पिशव्यांचे मशीन बसवून अजब प्रयोग केला आहे. प्रशासकीय राजवटीत अशा प्रकारे अवास्तव खर्च दाखवून अनेक कामे उरकण्यात आल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
घोटाळ्यांची मालिका बाहेर येणार?
रत्नागिरी नगरपालिकेची प्रशासकीय राजवट संपल्यानंतर आता जुने घोटाळे बाहेर येत आहेत. नवनियुक्त उप नगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी यापूर्वीच प्रशासकीय काळातील ‘शौचालय घोटाळा’ बाहेर काढला आहे. त्यानंतर आता शौचालयातील या बॅग वेंडिंग मशीनच्या प्रकरणाने प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नागरिकांमध्ये संतापाची लाट
सार्वजनिक शौचालयात कापडी पिशव्यांच्या मशीनची गरज काय? असा सवाल नागरिक विचारत आहेत. प्लास्टिक बंदीची जनजागृती बाजारपेठेत किंवा गर्दीच्या ठिकाणी करणे अपेक्षित असताना शौचालयाची निवड केल्याने हा केवळ निधी हडप करण्याचा प्रकार असल्याची टीका होत आहे.














