अपघातात जखमींना मिळणार कॅशलेस उपचार

रत्नागिरी : रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी अत्यंत निर्णायक ठरणाऱ्या गोल्डन अवरमध्ये उपचारांचा खर्च अडसर ठरू नये, यासाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या कॅशलेस वैद्यकीय उपचार योजनेंतर्गत रस्ते अपघातातील जखमींना सात दिवसांसाठी दीड लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. इतकेच नव्हे तर अपघातग्रस्ताला तातडीने रुग्णालयात पोहोचवून प्राण वाचवणाऱ्या मदतनीसाला राहवीर म्हणून २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

नवी कॅशलेस योजना, राहवीर योजना लवकरच राष्ट्रीय स्तरावर लागू केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. या निर्णयामुळे अपघातग्रस्तांसाठी दिलासादायक चित्र निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, रस्ते सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी मोटार वाहन कायद्यात एकूण ६१ दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. कॅशलेस वैद्यकीय उपचार योजनेच्या माध्यमातून रस्ते अपघातांची संख्या तसेच अपघातांमुळे होणारे मृत्यू कमी करण्याच्या सरकारचा ठोस प्रयत्न आहे. तातडीने उपचार, नागरिकांना मदतीसाठी प्रोत्साहन आणि पीडित कुटुंबाना आर्थिक आधार या त्रिसूत्रीमुळे रस्ते सुरक्षेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली होती आणि तिला मोठ्या प्रमाणात सकारात्मक अतिसाद मिळाला आहे. अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले असून त्यामुळे ही योजना यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता ही योजना राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात येणार आहे

मृतांच्या वारसांना २ लाख नुकसानभरपाई
हिट अॅन्ड रन प्रकारातील अपघातात मृत्यू झाल्यास संबंधित मृताच्या वारसांना २ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. या तरतुदीमुळे अशा अपघातांतील पीडित कुटुंबांना तातडीची आर्थिक आधार मिळणार असून न्याय व मदतीची प्रक्रिया अधिक बळकट होणार आहे. त्यामुळे गरजूंना लाभमिळणार आहे.

राहवीर संकल्पनेंतर्गत प्रोत्साहन देणार
रस्ते अपघातात जखमी व्यक्तीला तातडीने मदत करून रुग्णालयात पोहोचवणाऱ्या नागरिकांना सरकारकडून २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. राहवीर या संकल्पनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या या प्रोत्साहनामुळे अपघातस्थळी मदतीसाठी पुढे येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा व्यक्ती केली जात आहे. परिणामी अनेक अपघातग्रस्तांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:39 PM 30/Jan/2026