लाडक्या दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रत्नागिरीत उद्या ‘सर्वपक्षीय शोकसभा’; सर्व स्तरांतून उपस्थित राहण्याचे आवाहन

रत्नागिरी: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जनसामान्यांचे लोकप्रिय नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार यांच्या अनपेक्षित निधनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर शोककळा पसरली आहे. २८ जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात दादांचे निधन झाल्याची बातमी येताच सर्वसामान्य जनतेपासून ते वरिष्ठ पातळीवरील सर्वच क्षेत्रातील मंडळी हादरून गेली आहेत. या लाडक्या लोकनेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवार, ३१ जानेवारी रोजी रत्नागिरीत भव्य ‘सर्वपक्षीय शोकसभेचे’ आयोजन करण्यात आले आहे.

लोकनेत्याचा असा अनपेक्षित निरोप

अजितदादा पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर, स्पष्टवक्ता आणि विकासाचा ध्यास असलेले व्यक्तिमत्व. त्यांच्या निधनामुळे राजकारणासह समाजकारणाचीही मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील समस्त जनतेच्या वतीने या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व स्तरांतून उमटणार शोकसंवेदना

या शोकसभेत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सदस्य, विविध सामाजिक संस्था, वकील, डॉक्टर्स, बिल्डर्स असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, विविध मंडळे, ट्रस्ट आणि व्यापारी आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सर्वसामान्य जनतेच्या वतीने आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी हे एक हक्काचे व्यासपीठ असणार आहे.

शोकसभेचा तपशील:

  • दिनांक: ३१ जानेवारी २०२६
  • वार: शनिवार
  • वेळ: संध्याकाळी ५.०० वाजता
  • ठिकाण: हॉटेल व्यंकटेश हॉल, पहिला मजला, मारुती मंदिर सर्कल समोर, मारुती मंदिर, रत्नागिरी.

उपस्थित राहण्याचे आवाहन

ही शोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (रत्नागिरी तालुका आणि शहर) यांच्या वतीने आयोजित करण्यात आली असली, तरी ही एक सार्वजनिक श्रद्धांजली सभा आहे. रत्नागिरी तालुक्यातील सर्व नागरिक आणि बांधवांनी या शोकसभेला उपस्थित राहून दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन शोकाकुल राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातर्फे करण्यात आले आहे.