सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाची मागणी; साळवी अपघात प्रकरणात ॲड. संकेत घाग मांडणार पीडितांची बाजू!
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील लाला कॉम्प्लेक्स परिसरात १८ जानेवारी रोजी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहर हादरले होते. या अपघातात पत्नी गमावलेल्या राजेश दिनकर साळवी यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, आरोपी कारचालकाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०५ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांना सविस्तर निवेदन दिले आहे.
नेमकी घटना काय?
१८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास गोगटे कॉलेज ते जेल नाका या वर्दळीच्या रस्त्यावर हा अपघात घडला होता. अखिल ताजुद्दीन पटेल याने आपल्या ताब्यातील होंडा सिटी कार अत्यंत बेदरकारपणे चालवत टीव्हीएस ज्युपिटर दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या सौ. सुनीता राजेश साळवी (वय ५८) या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर आरोपी पसार; जामिनामुळे संताप
अपघातानंतर आरोपी अखिल पटेल घटनास्थळी न थांबता पसार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याला दोन दिवसांनी अटक केली, मात्र त्याला तातडीने जामीन मिळाल्याने साळवी कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी आरोपीची पोलीस कोठडी न मागता केवळ न्यायालयीन कोठडी मागितल्यामुळे त्याला सहज जामीन मिळाला, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
हा केवळ अपघात नाही, तर गुन्हा!
राजेश साळवी यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे की:
जाणीवपूर्वक निष्काळजीपणा : अपघात झाला तो रस्ता अत्यंत अरुंद आणि वर्दळीचा आहे, तिथे भरधाव गाडी चालवणे धोक्याचे आहे हे माहित असूनही आरोपीने बेदरकारपणा केला.
अंगावरून वाहन नेले : धडक दिल्यानंतर जखमी महिलेच्या अंगावरून वाहन नेऊन आरोपीने पळ काढला, त्यामुळे हा केवळ अपघात नसून गंभीर गुन्हा आहे.
पीडित कुटुंबाच्या प्रमुख मागण्या:
१. कलम १०५ अंतर्भूत करा: आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. २. जामीन रद्द करा: आरोपीचा जामीन रद्द करून त्याला रत्नागिरी शहर सोडण्यास प्रतिबंध घालावा. ३. पुरावे जप्ती: सीसीटीव्ही फुटेज कायदेशीररित्या जप्त करून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवावेत. ४. सहआरोपींवर कारवाई: आरोपीला पळून जाण्यास मदत करणाऱ्यांनाही सहआरोपी करावे.
न्यायाची अपेक्षा आणि पोलिसांची ग्वाही
या प्रकरणात पीडित कुटुंबाच्या वतीने ऍड. संकेत घाग यांनी वकीलपत्र घेतले असून ते कायदेशीर बाजू मांडत आहेत. पोलीस अधीक्षक यांनी राजेश साळवी यांचे म्हणणे ऐकून घेतले असून, आरोपीवर योग्य आणि शक्य ती कडक कारवाई निश्चितपणे केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे. शहरात या घटनेमुळे तीव्र संताप असून साळवी कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी नागरिक करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 31/Jan/2026














