‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाला भाजपचे पूर्ण समर्थन’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई/नागपूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड होणार असून त्या आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाला भाजपचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.

‘राष्ट्रवादी जो निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी आम्ही’ – मुख्यमंत्री

नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाची नियुक्ती करायची किंवा कोणता राजकीय निर्णय घ्यायचा, हा पूर्णतः त्या पक्षाचा अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जो काही निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी सरकार आणि भाजप ठामपणे उभे राहील. अजित दादांचे कुटुंब आणि पक्ष या कठीण प्रसंगात एकटे नाहीत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.”

महत्त्वाच्या खात्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे संकेत

अजित पवार यांच्याकडे असलेले ‘वित्त आणि नियोजन’ खाते सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “अजित दादांनी अर्थसंकल्पा संदर्भात मोठी तयारी केली होती. आता उद्यापासून मी स्वतः या प्रक्रियेत लक्ष घालून पुढील कार्यवाही पूर्ण करेन. त्यानंतर सर्वांशी चर्चा करून एकत्रित निर्णय घेतला जाईल.” राष्ट्रवादीचे नेते अर्थ खाते स्वतःकडे ठेवण्यासाठी आग्रही असले तरी, तूर्तास मुख्यमंत्र्यांनी यावर थेट भाष्य करणे टाळले आहे.

आजच्या राजकीय घडामोडींचा ‘रोडमॅप’:

  • दुपारी २ वाजता: मुंबईतील विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वाची बैठक. सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होणार.
  • संध्याकाळी: राजभवनावर सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होण्याची शक्यता.
  • नवा रेकॉर्ड: शपथविधी झाल्यास सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील.
  • पार्थ पवार यांची वर्णी: सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

नितीन गडकरींशी चर्चा आणि स्थानिक निवडणुका

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन नागपूर महापौर निवडणुकीबाबतही चर्चा केली. “नितीन गडकरी आमचे मार्गदर्शक आहेत. महापौर निवडणुकीची रूपरेषा ठरली असून, नाव अंतिम करण्याचा निर्णय स्थानिक शहर अध्यक्ष आणि आमदार घेतील,” असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘शो मस्ट गो ऑन’ – राष्ट्रवादीची भूमिका

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी “शो मस्ट गो ऑन” म्हणत पक्षाची जबाबदारी कोणाकडे तरी सोपवणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, आमदारांच्या आणि जनतेच्या भावनांचा विचार करूनच सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 31-01-2026