नवीन शपथविधी करण्याइतकी काय घाई?, संपूर्ण महाराष्ट्र आज हळहळतोय, सत्ता आणि स्वार्थ हेच आता एकमेव सत्य : अंजली दमानिया

मुंबई : राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र शब्दांत टीका केली असून, “भाजपचा सत्ता संघर्ष सुरू आहे आणि फोडाफोडीचं राजकारण उघडपणे केलं जात आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या की, “संपूर्ण महाराष्ट्र आज हळहळतोय. सत्ता आणि स्वार्थ हेच आता एकमेव सत्य उरलं आहे. मी स्वतः आयुष्यभर सत्तेविरोधात लढले, तरीही या घटनेने मला प्रचंड दुःख झालं.” ज्या प्रकारे अपघात घडला आणि त्यानंतर मृत्यू झाला, ते अत्यंत दुर्दैवी असल्याचं सांगत, “असं कोणासोबतही घडायला नको,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दमानिया म्हणाल्या, “कालच अस्थीविसर्जन झालं आणि आज सर्व मंडळी मुंबईकडे शपथविधीसाठी धाव घेत आहेत. ज्यांच्यासोबत इतकी वर्षं काम केलं, त्यांनाच अवघ्या तीन दिवसांत मागे टाकून नवीन शपथविधी करण्याइतकी काय घाई होती?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या असत्या तर सर्वांनाच आनंद झाला असता, असं सांगत दमानिया म्हणाल्या, “मात्र थोडा संयम ठेवून, काही दिवस थांबून हे घडलं असतं, तर त्याला वेगळं वजन मिळालं असतं. इतकी घाई करण्याची गरज नव्हती.” या घाईमुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा मागे पडल्याचंही दमानिया यांनी सांगितलं.

“हे सगळं भाजपचं षडयंत्र आहे. ‘आत्ताच शपथ घ्या’ असा दबाव टाकून फोडाफोडीचं राजकारण केलं जात आहे. हा भाजपचा फार मोठा गेम आहे,” असा आरोप करत त्यांनी स्पष्ट केलं की, “कुठेतरी सतत फोडाफोडीचं राजकारण सुरूच आहे आणि ते भाजपने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलं आहे, असा आरोप दमानिया यांनी केला.

यावेळी त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचाही उल्लेख करत टीका केली. “हे दोघेही एका पायावर भाजपमध्ये जाण्यास तयार आहेत,” असा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:10 31-01-2026