‘देवखेल’ वेबसीरीज वादाच्या भोवऱ्यात! कोकणच्या ‘शंखासुराचे’ विकृतीकरण केल्याप्रकरणी ZEE5 ला कायदेशीर नोटीस

◼️ रत्नागिरीतून ‘देवखेल’ला पहिला कायदेशीर विरोध; ॲड. अमित नागवेकरांचा इशारा

रत्नागिरी : कोकणच्या मातीतील अत्यंत मानाच्या आणि श्रद्धेच्या ‘शंखासूर’ (संकासूर) या लोकदेवतेचे ‘देवखेल’ या वेबसीरीजमध्ये विकृत आणि गुन्हेगारी स्वरूपात सादरीकरण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रत्नागिरीतील प्रसिद्ध आयपी (IP) आणि सायबर कायदेतज्ज्ञ ॲड. अमित नागवेकर (AN Law Firm) यांनी झी५ (ZEE5), दिग्दर्शक आणि निर्मात्यांना कडक कायदेशीर नोटीस बजावली आहे.

काय आहे नेमका वाद?
झी५ (ZEE5) प्लॅटफॉर्मवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘देवखेल’ या वेबसीरीजमध्ये आणि त्याच्या प्रसिद्धी साहित्यात शंखासूर या पात्राला एका भयानक ‘सिरीयल किलर’च्या रूपात दाखवण्यात आले आहे. वास्तविक, कोकणवासीयांच्या दृष्टीने शंखासूर हे शिमगोत्सव आणि नमन कलेतील एक पवित्र श्रद्धास्थान असून, तो वाईट प्रवृत्तींचा नाश करणारा लोकदेव मानला जातो. अशा देवतेचे व्यावसायिक फायद्यासाठी ‘गुन्हेगारीकरण’ केल्यामुळे संपूर्ण कोकण पट्ट्यात संतापाची लाट उसळली आहे.

कायदेशीर कलमे आणि महत्त्वाचे मुद्दे
ॲड. अमित नागवेकर यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये निर्मात्यांवर खालील कलमांनुसार ठपका ठेवण्यात आला आहे:

कलम २९५ अ (धार्मिक भावना): शंखासुराचे हिंसक चित्रण करून हिंदूंच्या आणि विशेषतः कोकणच्या पारंपरिक श्रद्धा जपणाऱ्या जनतेच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावल्या गेल्या आहेत.

कलम १५३ अ: लोकदेवतेला गुन्हेगार म्हणून प्रोजेक्ट करून समाजात तेढ आणि अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

आयटी नियम २०२१ चे उल्लंघन: डिजिटल मीडियावर धर्माचा अवमान करणारा आशय प्रसारित करणे हे आयटी नियमांमधील आचारसंहितेचा भंग करणारे आहे.

सांस्कृतिक हक्कांचे उल्लंघन: शंखासूर ही कोकणची ‘पारंपरिक सांस्कृतिक अभिव्यक्ती’ (TCE) असून तिच्या मूळ स्वरूपात बदल करणे हा समाजाच्या नैतिक अधिकारांवर गदा आणणारा प्रकार आहे.

“व्यावसायिक नफ्यासाठी आमच्या लोकपरंपरांचे आणि देवतांचे विकृतीकरण आम्ही कधीही सहन करणार नाही. ही नोटीस म्हणजे आमच्या समृद्ध संस्कृतीचा अपमान करणाऱ्यांना दिलेला एक कायदेशीर इशारा आहे.”

— ॲड. अमित नागवेकर (आयपी लॉयर, रत्नागिरी)

निर्मात्यांना ७२ तासांचा अल्टिमेटम
या नोटीसद्वारे ॲड. नागवेकर यांनी निर्मात्यांना ७२ तासांचा अवधी दिला आहे. या कालावधीत खालील मागण्या पूर्ण न झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे: १. आक्षेपार्ह आशय प्लॅटफॉर्मवरून त्वरित हटवणे. २. जनतेची बिनशर्त लेखी माफी मागणे. ३. मालिकेत योग्य तो ‘डिस्क्लेमर’ लावणे.

जर या मागण्या मान्य न झाल्यास, रत्नागिरी न्यायालयात फौजदारी आणि दिवाणी खटला दाखल करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे आता मनोरंजन विश्वात आणि कोकणात मोठी खळबळ उडाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 02-02-2026