खेड : खेड शहरालगत असलेल्या खारी नांदगाव परिसरात रविवारी सायंकाळी एका अपंग व्यक्तीच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेताच्या चोंड्यात जाऊन कोसळली. मात्र, अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दुचाकीपासून काही अंतरावर मांसाचे तुकडे पडलेले असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. ही बाब पाहताच परिसरात बघता बघता मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी जमली. घटनास्थळी चर्चेला उधाण आले असून, अपघातग्रस्त दुचाकीस्वार याच दुचाकीवरून मांसाची वाहतूक करत असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये ऐकू येत होत्या.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. रस्त्यालगत आणि शेताच्या परिसरात आढळलेले मांसाचे तुकडे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ते तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनेमुळे काही काळ खेड शहरासह खारी नांदगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरात सापडलेले मांस नेमके कोणत्या प्राण्याचे आहे, तसेच त्याची वाहतूक कुठून व कशासाठी केली जात होती, याबाबतचा तपास पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिसांच्या पुढील तपासातून या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 02/Feb/2026














