रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाचे पुराभिलेख संचालनालय आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २८ व २९ जानेवारी २०२६ रोजी एका विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याशी संबंधित दुर्मिळ पुराभिलेख, शासकीय दस्तऐवज आणि ऐतिहासिक छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या निधनाची वार्ता समजताच नियोजित उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि अभिलेखाधिकारी श्री. गणेश खोडके यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
हे प्रदर्शन आयोजित करण्यामागे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक अमूल्य ठेव्याची माहिती सर्वसामान्य जनता आणि अभ्यासकांना व्हावी हा मुख्य हेतू होता. पुराभिलेख संचालनालय हे राजकीय, प्रशासनिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीचे दर्शन घडवण्याचे आणि ऐतिहासिक कागदपत्रांचे जतन करण्याचे महत्त्वाचे कार्य करते. या प्रदर्शनाचे महत्त्व अधोरेखित करताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी नमूद केले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मूळ साधनांच्या आधारे शिक्षण मिळणे त्यांच्या बौद्धिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. भारतीय स्वातंत्र्यलढा आणि लोकशाही मूल्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी हे प्रदर्शन अत्यंत प्रेरणादायी ठरले.
या दोन दिवसीय प्रदर्शनास रत्नागिरीतील विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. यामध्ये भा. शिर्के प्रशाला (२००), श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यम शाळा (१७५), अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय (१५०) यांसह फाटक हायस्कूल, नवनिर्माण विद्यालय व इतर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांव्यतिरिक्त अनेक शिक्षक, संशोधक आणि इतिहासप्रेमी अशा सुमारे अडीचशे नागरिकांनी या दुर्मिळ ठेव्याचे अवलोकन केले.
या प्रदर्शनाचे यशस्वी नियोजन महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने केले, ज्यामध्ये विभागप्रमुख डॉ. पंकज घाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. पुराभिलेख संचालनालयाचे संचालक श्री. सुजितकुमार उगले आणि त्यांच्या चमूने प्रदर्शनासाठी आवश्यक सामग्री आणि तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून दिले. या उपक्रमाला महाविद्यालयाच्या विविध शाखांच्या उपप्राचार्यांनी शुभेच्छा दिल्या, तर १२ स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाच्या व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरी बजावली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 02/Feb/2026














