पाचल : ग्रामीण समाज प्रबोधिनी, येळवण संचलित विद्यानिकेतन येळवण येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित माता-भगिनी समता स्नेहमेळाव्यात राजापूरचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. करिअर निवडताना स्वतःच्या क्षमतांची जाणीव असणे अत्यंत महत्त्वाचे असून सकस आहारासोबत नियमित व्यायामाचीही तितकीच गरज आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निरीक्षक यादव म्हणाले की, दैनंदिन घडामोडींची माहिती ठेवण्यासाठी दररोज वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावावी. विशेषतः संपादकीय लेख आणि महत्त्वाच्या हेडलाईन्स वाचल्याने विचारक्षमता विकसित होते. तसेच आपत्कालीन परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून विविध हेल्पलाईन क्रमांकांचा उपयोग कसा करावा, याविषयीही त्यांनी सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमानिमित्त कला प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन तसेच विद्यार्थ्यांचे रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष चंदूभाई देशपांडे होते. यावेळी मराठी चित्रपट दिग्दर्शक व संकलक रोहन देशपांडे, संस्था सदस्य सुधीर शिर्के, सरपंच दीपाली जाधव, माजी मुख्याध्यापिका रेवती कोळेकर, पोलिसपाटील शुभदा सकपाळ, रिना तावडे आदी उपस्थित होते. परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 02/Feb/2026














