Sangameshwar : जि.प. पिरंदवणे शाळेच्या संतोष चव्हाण गुरुजींची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत यश

संगमेश्वर : केंद्रप्रमुख पदाची अतिरिक्त जबाबदारी, शाळेचे मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असणारे जि. प. शाळा पिरंदवणे नं. १ चे उपक्रमशील, आदर्श शिक्षक संतोष चव्हाण यांनी नागपूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत द्वितीय स्थानावर आपली मोहर उमटवली आहे.

तालुक्यातील कोळंबे येथील चव्हाण गुरुजींना शैक्षणिक साहित्य निर्मितीची आवड अगदी सुरुवातीपासून होती. गणित अध्यापनात वैविध्य आणताना त्यामध्ये नाविन्यपूर्ण साहित्यनिर्मिती करून त्यांनी संगमेश्वर तालुका, रत्नागिरी जिल्हास्तरीय प्रदर्शनात प्रथम पारितोषिक पटकावले. याबाबत सविस्तर वृत्त आणि त्यांची प्रतिक्रिया लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या या यशामुळे संगमेश्वर तालुका व रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राला झळाळी प्राप्त झाली असल्याने त्यांचे समस्त सहकारी व अधिकारी वर्गाकडून कौतुक करण्यात येत आहे. सरपंच पिरंदवणे ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 02/Feb/2026