मत्स्यव्यवसाय आणि पशुपालनावर लक्ष केंद्रित करणारा हा ‘सर्वसमावेशक’ अर्थसंकल्प : संतोष पावरी

रत्नागिरी : सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर खारवी समाज पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी आपली सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. हा अर्थसंकल्प व्यावसायिक आणि पशुपालक यांना केंद्रस्थानी ठेवणारा असून, किनारपट्टीवरील समुदायासाठी प्रगतीची नवी दारे उघडणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पावरी यांनी प्रामुख्याने ५०० एकात्मिक मत्स्य व्यवसाय केंद्रांच्या उभारणीचे स्वागत केले आहे. “या केंद्रांमुळे केवळ मासळीचे उत्पादन वाढणार नाही, तर स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग, निर्यात क्षमता आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मत्स्य व्यवसायात महिलांचा सहभाग वाढवण्याचा निर्णय सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी क्रांतीकारक ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

हवामान बदलाच्या संकटात नारळ उत्पादन वाढवणे आणि संशोधन केंद्रांची स्थापना करणे ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी सरकारचे कौतुक केले. यासोबतच काजू आणि कोकोला जागतिक बँड बनवण्याच्या घोषणेचे त्यांनी स्वागत केले. मात्र, याचा प्रत्यक्ष लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सागर किनारपट्टीवरील शेतकऱ्यांना मदत आणि दुग्ध व्यवसायाला मिळणाऱ्या सवलतींमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 02/Feb/2026