सातारा/फलटण: बारामती विमान अपघाताच्या भीषण घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आजही सुन्न आहे. या अपघातात राज्याचे लाडके नेतृत्व अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. या अपघातात अजितदादांच्या सावलीसारखे सोबत असणारे त्यांचे निष्ठावंत सुरक्षारक्षक विदीप जाधव यांनीही प्राण गमावले. या दुहेरी आघातानंतर महाराष्ट्र हळहळत असतानाच, नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज संवेदनशीलतेचा एक मोठा आदर्श घालून दिला.
वैयक्तिक दुःख बाजूला सारून ‘सांत्वनपर’ दौरा
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आज आपल्या सार्वजनिक दौऱ्याची सुरुवात केली. सर्वात आधी त्यांनी कराड येथील प्रीतीसंगम येथे जाऊन महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर, कोणताही बडेजाव न मिरवता त्या थेट फलटण तालुक्यातील तरडगाव येथील विदीप जाधव यांच्या निवासस्थानी पोहोचल्या.

‘मी तुमच्या सोबत आहे’ – जाधव कुटुंबीयांना दिला आधार
विदीप जाधव यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुनेत्रा पवार यांनी जाधव यांच्या पत्नी आणि मुलांची भेट घेतली. पती निधनाचे स्वतःचे दुःख उराशी असतानाही, सुनेत्रा वहिनींनी अत्यंत संयम राखून जाधव यांच्या चिमुरड्यांच्या डोक्यावर मायेने हात फिरवला. “कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे, खचून जाऊ नका,” असा धीराचा शब्द त्यांनी दिला. या भावस्पर्शी प्रसंगामुळे उपस्थितांचेही डोळे पाणावले.

विदीप जाधव: एक निष्ठावंत सुरक्षारक्षक
- विदीप जाधव हे मूळचे फलटण तालुक्यातील लोणंदचे रहिवासी होते.
- २००९ च्या पोलीस बॅचचे कॉन्स्टेबल असलेले विदीप जाधव गेल्या ७ वर्षांपासून अजित पवारांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) म्हणून कार्यरत होते.
- अत्यंत शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. दुर्दैवाने कर्तव्य बजावत असतानाच त्यांचा अपघातात मृत्यू झाला.

रोहित पवारांकडून मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
यापूर्वी आमदार रोहित पवार यांनीही तरडगाव येथे जाऊन जाधव कुटुंबीयांची भेट घेतली होती. “दुःख वाटल्याने कमी होते, आम्ही सर्वजण जाधव कुटुंबासोबत आहोत,” असे ट्विट करत त्यांनी आपली भावना व्यक्त केली होती. विशेष म्हणजे, रोहित पवार यांनी विदीप जाधव यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून मदतीचा हात पुढे केला आहे.
चर्चा संवेदनशीलतेची!
एकीकडे राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून मोठी जबाबदारी खांद्यावर आलेली असताना आणि दुसरीकडे पती निधनाचे वैयक्तिक दुःख असतानाही, आपल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाप्रति दाखवलेली ही कृतज्ञता सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राजकारणापलीकडे जाऊन जपलेल्या या माणुसकीमुळे सुनेत्रा पवार यांच्याबद्दल सर्वच स्तरातून आदर व्यक्त केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:07 02-02-2026














